साहेब माझ्या कुटुंबाला वाचवा, पुण्यात राहणाय्रा परळी तालुक्यातील कन्येचं पालकमंत्री धनंजय मुंडेंना पत्र !

साहेब माझ्या कुटुंबाला वाचवा, पुण्यात राहणाय्रा परळी तालुक्यातील कन्येचं पालकमंत्री धनंजय मुंडेंना पत्र !

पुणे – परळी तालुक्यातील गर्देवाडी येथील रहिवासी असणाय्रा एका कन्येनं बीडचे पालकमंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांना पत्र लिहिलं आहे. संजीवनी सुरेश ढवाण असं या चिमुकलीचं नाव असून ती सध्या पुण्यात वास्तव्यास आहे. संजिवनीचे वडिल काही वर्षांपासून पुण्यात ड्रायव्हरची नोकरी करतात. परंतु गेली काही महिन्यांपासून त्यांना नोकरी मिळत नव्हती. फेब्रुवारीमध्ये एका ट्रकवर त्यांना नोकरी मिळाली परंतु कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे काम बंद झालं. आई-वडिलांच्या हाताला काम नाही. खाणारे पाच तोंडं. वडिलांच्या डोक्यावर तीन लाखांचं कर्ज. घरभाडं, रेशन कसं भागवायचं?, पुढील शिक्षणाचं काय होणार ? या प्रश्नांच्या विळख्यात सापडलेल्या या मुलीनं थेट पालकमंत्री धनंजय मुंडे यांना पत्र लिहिलं आहे. त्यामुळे तिच्या या पत्राला धनंजय मुंडे काय उत्तर देणार हे पाहण गरजेचं आहे.

मुलीचं धनंजय मुंडेंना पत्र

आदरनीय
धनंजय मुंडे साहेब
पालकमंत्री, बीड.

साष्टांग नमस्कार ,

महोदय मी संजीवनी सुरेश ढवाण.
आपल्याच जिल्ह्यातील आणि मतदारसंघातील एक कन्या आहे. आपण जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे तुम्ही माझेही पालक आहात. आई-वडिल हे माझे जन्मदाते आणि पहिले पालक आहेत. तर दुसरे पालक तुम्ही आहात. फरक फक्त एवढाच आहे की माझ्या आई-वडिलांच्या कुटुंबात आम्ही पाच जण आहोत तर तुमच्या कुटुंबात जिल्ह्यातील सर्व नागरिक आहेत. आपलं कुटुंब मोठं असल्यामुळे सर्वांकडे वैयक्तिक लक्ष देणं तुमच्यासाठी कठिण आहे. त्यामुळे माझा आवाज आणि कुटुंबातील यातना तुमच्यापर्यंत पोहचाव्या यासाठी मी हे पत्र लिहिण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.

खरतर लहानपणापासून माझ्या – आई वडिलांनी आपला स्वभिमान कोणापुढेही गहाण ठेवायचा नसल्याची शिकवण आम्हाला दिली आहे. परंतु मी आपल्याला माझे पालकच मानत असल्यामुळे तुमच्यापुढे माझ्या यातना मांडत आहे. आपण आजपर्यंत सत्तेत असताना आणि नसतानाही माझ्यासारख्या लाखो गरजूंना सढळ हाताने मदत केली आहे. मायेची सावली दिली आहे. त्यामुळे तुम्ही मलाही वाय्रावर सोडणार नाहीत याची खात्री आहे. कारण आपण राजकारणापेक्षा समाजकारण जास्त करता हे मी माझ्या डोळ्यांनी बघत आले आहे.

साहेब माझे आई-वडिल स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांना देवाप्रमाणे मानायचे. परंतु ते गेल्यानंतर त्यांच्या रुपात ते तुम्हाला पाहतात. त्यामुळेच ते आपलं काम सोडून आणि पदरचे पैसे खर्चून तुम्हाला मतदान करण्यासाठी प्रत्येकवेळी पुण्यातून गावाकडे जातात. का तर आपले साहेब निवडून आले पाहिजेत.

असो, साहेब मी या वर्षी इयत्ता 10वी मध्ये शिकत होते. आम्ही मूळचे गर्देवाडी ता. परळी, जि . बीड येथील रहिवासी आहोत. माझे वडिल ड्रायव्हर असून गेली २० वर्षांपासून ते पुण्यात राहतात. आज सध्य स्थितीला कोरोनामुळे सर्वांचे हाल होत आहेत. या संकटाच्या काळी अनेक देवमाणसांनी मदतीचा हात देखील पुढे केला आहे. परंतु आज अशी कुटुंबे आहेत की ज्यांना मदतीची अत्यंत गरज असून त्यांना ती मदत मिळत नाही . ज्यांना रेशन कार्ड नाहीत त्यांचे हाल जास्त चालू आहेत. या कुटुंबापैकी एक माझं देखील कुटुंब आहे.

घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. वडिल कर्जबाजारी आहेत. वडिलांच्या डोक्यावर तीन लाखांचं कर्ज आहे. अशातच हातातून काम गेलं आहे. घरात अन्न – धान्याचा तुटवडा भासत आहे. मला एक बहिण आहे. ती आता इयत्ता 8 वी मध्ये प्रवेश करेल आणि एक भाऊ जो आता इयत्ता 3री मध्ये प्रवेश करेल. घरात आम्ही एकूण पाच सदस्य आहोत. आमच्या शाळेचा खर्च, शाळेची फी, भरण्यासाठी आईचे दागिणे देखील गहाण ठेवावे लागलेले आहेत. सोन्याचे व्याज, घर भाड , काढलेलं कर्ज या सर्वांमुळे आम्ही खूप हावलदिल झालेलो आहोत. कधी – कधी खायला अन्न देखील नसते , बिना मिठाची अगदी बिना तेलाची देखील भाजी खावी लागते आहे. वडिलांचं काम गेल्यामुळे गेली काही महिन्यांपासून आई स्वयपाकाचं काम करत होती.


परंतु कोरोनामुळे तेही आता बंद झालं आहे. त्यामुळे परिस्थिती अजूनच बिकट झालेली आहे, घरात अन्न – धान्य 6-7 दिवसांचच आहे ,, पैशाचा तर तुटवडाच तुटवडा आहे. वडिलांच्या डोक्यावर कर्ज, सगळी कामं ठप्प. अजून किती दिवस हे बंद राहील हे सांगता येत नाही. त्यामुळे डोक्यावरील कर्ज, घरभाडं, आईचे दागिणे, आमचं पुढील शिक्षण हा एकदम येणारा खर्च कसा सारायचा हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आपण काही तरी करुन आम्हाला या संकटातून बाहेर काढा.

साहेब पुढे चालून माझं आयपीएस अधिकारी बनण्याचं स्वप्न आहे. परंतु पुढचं हे संकट पाहून आयएएस होणं तर सोडाच परंतु जगण देखील मुश्किल दिसत आहे. त्यामुळे आता माझ्या या कुटुंबाचा आशेचा किरण फक्त तुम्हीच आहात. आमच्यासाठी आमच्या कुटुंबाचे पालक तुम्हीच आहात. तुम्हीच आम्हाला मदत करा ! माझी आणि माझ्या कुटुंबाची आपल्याला कळकळीची विनंती आहे. आपण आम्हाला मदत करावी. आमच्या या हाकेला ओ द्या साहेब !!!!!

आपण केलेल्या मदतीची पुढे चालून मी स्वत: नोकरी करुन परत फेड करेन अशी ग्वाही मी तुम्हाला देते. परंतु सध्या तरी आम्हाला या चिखलातून बाहेर काढा. ही कळकळीची विनंती.

आपलीच पाल्य
संजीवनी सुरेश ढवाण
थेरगाव, पुणे.
मो. 9119502147
9763236165

COMMENTS