बीड – पाणीपुरवठा योजनेसाठी पंकजा मुंडेंनी आणला 184 कोटींचा निधी, सर्वच तालुक्यांना होणार फायदा !

बीड – पाणीपुरवठा योजनेसाठी पंकजा मुंडेंनी आणला 184 कोटींचा निधी, सर्वच तालुक्यांना होणार फायदा !

बीड – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी जिल्हयातील नवीन पाणीपुरवठा योजनांसाठी १८४ कोटी रुपयांचा निधी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत मंजूर करून घेतला आहे, प्रत्यक्ष आराखड्यानुसार यात वाढही होवू शकते. सर्वच्या सर्व अकराही तालुक्यांमध्ये सुमारे २९३ योजनांची कामे यातून होणार आहेत.

दरम्यान जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करणे व जिल्ह्यात नवीन योजना आणण्यासाठी नागपूर येथे पावसाळी अधिवेशना दरम्यान त्यांनी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासमवेत सर्व संबंधित अधिका-यांची बैठक घेतली होती. या बैठकीत या सर्व बाबींवर चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार हा आराखडा विभागाने मंजूर केला आहे.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचा सन २०१८-१९ चा पाणीपुरवठा योजनेचा आराखडा ना. पंकजाताई मुंडे यांनी मंजूर करून घेतला असून या अंतर्गत जिल्हयातील अकराही तालुक्यांमध्ये २९३ योजनांसाठी १८४ कोटी रूपये पाणीपुरवठा विभागाने मंजूर केले आहेत. पांच कोटीपेक्षा जादा रक्कमेच्या योजना ह्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा मार्फत तर पांच कोटीपेक्षा कमी रक्कमेच्या योजना ह्या जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणार आहेत.

 अशा मंजूर झाल्या तालुकानिहाय योजना

पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या  सर्व भागाचा समतोल विकास साधण्याच्या धोरणाची चुणूक यातही दिसून येते. त्यांच्या प्रयत्नांमुळे सर्व तालुक्यातील गावांमध्ये नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत. तालुकानिहाय मंजूर झालेल्या योजना व त्याची रक्कम पुढीलप्रमाणे बीड – ४१ ( १२ कोटी ९३ लाख) माजलगांव – १८ ( ६ कोटी ६८ लाख ) अंबाजोगाई – १२ ( ७ कोटी ८२ लाख) आष्टी – ४७ (६० कोटी ४७ लाख) धारूर – ११ ( ३ कोटी १४ लाख) गेवराई – १७ ( ७ कोटी ८८ लाख ) केज – २७ ( ३२ कोटी ९३ लाख) पाटोदा – ३५ (९ कोटी ७० लाख) शिरूर कासार – २९ (१० कोटी ८९ लाख) वडवणी – ०६ ( १ कोटी ६३ लाख), दरम्यान मंजूर झालेल्या निधीत जलस्वराज टप्पा क्रमांक दोनच्या राहिलेल्या कामांचा निधी देखील समाविष्ट आहे.

 परळी मतदारसंघात १५ योजना

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल आराखड्यात परळी मतदारसंघात १५ गावांमध्ये नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. परळी तालुक्यात सोनहिवरा, पांगरी, मोहा, इंदपवाडी, जिरेवाडी, मैंदवाडी ( मैंदवाडी तांडा व सेवानगर तांडा) नागापूर व बेलंबा या गांवासाठी ६ कोटी ९८ लाख रुपये इतका निधी योजनेसाठी मंजूर झाला तर अंबाजोगाई तालुक्यातील पण मतदारसंघात येणा-या दत्तपूर, हातोला, लिंबगांव, खापरटोन, घाटनांदूर, पुस व तळणी याठिकाणी ही योजना मंजूर झाली आहे.

 भगवान गड परिसरातील गावांना ९२ कोटी

राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भगवान गड परिसरातील ४२ गावांमध्ये पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना मंजूर करून घेतली आहे, त्यासाठी ९२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, सदर योजनेतील आराखड्याच्या मंजूर निधीत गरजेनुसार वाढ होणार असून निधीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

COMMENTS