ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा- उदयनराजे

ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा- उदयनराजे

सातारा – गावपातळीवरील कार्यकर्त्यांनी हेवेदावे विसरून सर्वांच्या वैचारिक सहकार्यातून ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध केल्यास त्याचे चांगले व दूरगामी परिणाम दिसतील. या निवडणुका संपूर्ण देशाला नवी दिशा देणाऱ्या ठरतील. त्यामुळे गावपातळीवरील कार्यकर्त्यांनी निवडणुका बिनविरोध कराव्यात, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर गावपातळीवरील कार्यकर्त्यांना खासदार उदयनराजे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे. “सातारा जिल्हयातील सुमारे ९०० ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. “निवडणूका या लोकशाहीचा पाया असल्या तरी त्या निकोप स्पर्धात्मक होणे हे अपेक्षित असते. अलिकडच्या काळात निवडणुकीत अनेक गावांत दोन उभे गट पडलेले दिसून येतात. तसेच सध्याची करोनाची पार्श्‍वभूमी पहाता, ग्रामीण भागातील जनता टाळेबंदी, अनलॉक या प्रक्रियेमुळे मेटाकुटीला आली आहे. अशापरिस्थितीत जिल्हयातील सुमारे ९०० ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणूका गावपातळीवरील असल्याने त्याचा धुरळा गावातील प्रत्येक घरात उडणार आहे. त्यामुळे करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता अधिक आहे. त्याऐवजी हेवेदावे विरहित सर्वांच्या वैचारीक सहकार्यातुन बिनविरोध निवडणूका झाल्यास, त्याचे चांगले दूरगामी परिणाम दिसतील. गावाच्या एकीद्वारे गाव करील ते राव  काय करील.. ही म्हण सार्थ ठरविणाऱ्या या निवडणुका संपूर्ण देशाला नवी दिशा देणा-या ठरतील. त्यामुळे हेवेदावे विरहित बिनविरोध निवडणुका कराव्यात”, असे आवाहन उदयनराजेंनी केले आहे.

COMMENTS