पालघर नगर परिषद निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना-भाजपला पाडण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची रणनिती !

पालघर नगर परिषद निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना-भाजपला पाडण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची रणनिती !

पालघर – पालघर नगर परिषद निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या नगरपरिषदेसाठी येत्या २४ मार्च रोजी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.  या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी एकत्रित आले आहेत. याबाबत तिन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. यादरम्यान नगराध्यक्षपदाचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असावा, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं केला आहे. सध्याचे नगर परिषदेमधील पक्षीय बलाबल पाहता आगामी निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचाच असावा, अशी आग्रही भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांची आहे.

दरम्यान पालघर नगर परिषदेमध्ये २८ पैकी सध्या राष्ट्रवादीचे १० नगरसेवक तर काँग्रेसचा एक, शिवसेना-भाजप १७ असे बलाबल आहे. याठिकाणी शिवसेना-भाजपची सत्ता असल्यामुळे आगामी निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून रणनिती आखली जात आहे.  या निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी यांच्यात आघाडी करण्याच्या दृष्टीने पाऊलं उचलली जात आहेत. याबाबत तिन्ही पक्षांच्या प्राधिकृत केलेल्या सदस्यांची चर्चा सुरु आहे.

नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षाकडे असलेल्या उमेदवाराकडे निवडून येण्याची क्षमता (इलेक्ट्रॉल मेरिट) अधिक असल्यास अशा उमेदवाराला राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणुकीत उतरवण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठेवला आहे. याबाबत काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी वरिष्ठांशी चर्चा करणार आहेत. त्याचप्रमाणे या निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाचे निरीक्षक दोन मार्च रोजी पालघरच्या दौऱ्यावर येणार असून निरीक्षकांमार्फत आघाडी करण्याबाबतचा प्रस्तावावर शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा विचार घेतला जाणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी यांच्यात जागावाटपावरून प्राथमिक चर्चा पूर्ण झाली आहे. काँग्रेस पक्ष आघाडीमध्ये सहभागी न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला  १९ जागा तर बहुजन विकास आघाडी नऊ (९) जागा लढवेल, असा प्राथमिक निर्णय घेण्यात आला असल्याचीही माहिती आहे.

COMMENTS