‘या’ नेत्याची 14 वर्षांनी भाजपमध्ये घरवापसी, पक्षाचंही करणार विलीनीकरण !

‘या’ नेत्याची 14 वर्षांनी भाजपमध्ये घरवापसी, पक्षाचंही करणार विलीनीकरण !

रांची – तब्बल 14 वर्षांनी ‘झारखंड विकास मोर्चा’चे अध्यक्ष बाबुलाल मरांडी हे भाजपमध्ये घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. रांचीमध्ये 17 फेब्रुवारीला आयोजित भव्य कार्यक्रमात ते अमित शाह आणि भाजपचे उपाध्यक्ष ओमप्रकाश माथूर यांच्या उपस्थितीत पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत.बाबुलाल मरांडी यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तर रविवारी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली होती. बैठकीत ‘झाविमो’ भाजपमध्ये विलीन करण्याचा मुहूर्त ठरवण्यात आला आहे. त्यामुळे रांचीत भाजपची ताकद वाढणार आहे.

2006 मध्ये बाबुलाल मरांडी भाजपमधून बाहेर पडले होते. त्यांनंतर त्यांनी ‘झारखंड विकास मोर्चा’ची स्थापना केली. गेल्या वर्षी झालेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत ‘झाविमो’ला केवळ पाच जागा मिळाल्या होत्या. भाजपच्या 12 जागा कमी झाल्याने त्यांनाही राज्यातील सत्ता गमवावी लागली होती. त्यामुळे झारखंडमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपनं बाबुलाल मरांडी यांना सोबत घेण्याचं ठरवलं आहे.

दरम्यान झारखंड विकास मोर्चाने 11 फेब्रुवारीला केंद्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. यामध्ये झारखंड विकास मोर्चाच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव मंजूर केला जाणार आहे. त्यानंतर हा प्रस्ताव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला पाठवण्यात येईल. त्यानंतर दोन्ही पक्ष याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला देणार आहेत. आयोगाच्या परवानगीने विलीनीकरण प्रक्रिया पार पडणार आहे.

COMMENTS