मंदिरांमध्ये नववर्षाच्या उत्सवावर सरकारची बंदी, कोणत्याही मंदिरावर विद्यूत रोषणाई करु नका !

मंदिरांमध्ये नववर्षाच्या उत्सवावर सरकारची बंदी, कोणत्याही मंदिरावर विद्यूत रोषणाई करु नका !

आंध्र प्रदेश – नववर्षानिमित्त कोणत्याही मंदिरावर विद्यूत रोषणाई करु नका अथवा फुलांवरही अव्वाच्या सव्वा खर्च करू नये. नववर्षाचा उत्सव हिंदू किंवा तेलगू परंपरेप्रमाणे नाही. त्यामुळे राज्यातील कोणत्याही मंदिरात नववर्ष साजरे करु नका असं परिपत्रक आंध्र प्रदेश सरकारनं काढलं आहे. तसेच आंध्र प्रदेशातील धार्मिक स्थळांचे व्यवस्थापन पाहणा-या देणगी, दाननिधी विभागाने नव्या वर्षाच्या उत्सवावर सरसकट बंदी घातली आहे. त्यामुळे मंदिरांमध्ये नववर्ष साजरे करणा-या भाविकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

तेलुगु नवीन वर्ष चैत्र मासात ‘उगडी’ नावाने ओळखले जाते. तो उत्सव स्वरूपात साजरा करण्यास हरकत नाही. त्यामुळे नववर्षाच्या निमित्ताने फुलांची सजावट, बॅनर आणि विशेष व्यवस्था करण्यासाठी पैसे खर्च करू नयेत. असं या परिपत्रकात म्हटलं आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानशिवाय राज्यातील इतर मंदिरांच्या प्रशासकीय बाबींवर हिंदू धर्म परीरक्षण ट्रस्टचे नियंत्रण आहे. या ट्रस्टचे सचिव सी. व्ही. राघवचारीयालु यांनी म्हटलं आहे की, यापूर्वी नवीन वर्षानिमित्त होणा-या कार्यक्रमात फुलांची सजावट आणि बॅनरवर लाखो रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. हिंदू आणि तेलुगु परंपरेनुसार १ जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरे करणे उचित नाही. त्यामुळे ही बंदी घालण्यात आली असल्याचं ते म्हणाले आहेत.

सुट्या तसेच नववर्षाच्या दिवशी नेहमीच सर्वत्र मंदिरात देवदर्शनासाठी जाणा-या भाविकांची संख्याही प्रचंड असते. परंतु सरकारनं यावर बंदी आणल्यामुळे नववर्षानिमित्त मंदिरात जाणा-या भाविकांसाठी मंदिरच बंद राहणार आहे.

COMMENTS