राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे भाजपाच्या वाटेवर ?

राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे भाजपाच्या वाटेवर ?

माढा – सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांनी भाजपा मध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत. माढा तालुक्यातील शिराळा येथे एका सत्कार सोहळ्यात मनोगत व्यक्त करित असताना आमदार बबनराव शिंदे भाजपा तालुका अध्यक्ष संजय कोकाटे यांना उद्देशून म्हणाले की .. ‘अजुन तुमची ऊमेदवारी फिक्स नाही , राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, कदाचित भविष्यात तुम्हालाच माझा प्रचार करावा लागेल’. शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या वक्तव्यातून शिंदे यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. त्यांचे बंधू संजय मामा शिंदे हे भाजपच्या मदतीने सध्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत.

काही दिवसापूर्वी कुर्डूवाडीच्या एका जाहिर सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार बबनराव शिंदे यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. याचा अर्थ घेऊन कदाचित आपल्याला आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचे तिकीट मिळणार नसल्याचे लक्षात घेऊन भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत अशी चर्चा आहे. आमदार शिंदे यांच्या वक्तव्याचा दुसराही अर्थ काढला जात आहे. संजय कोकाटे हेच राष्ट्रवादीमध्ये भविष्यात प्रवेश करतील अशीही शक्यता आहे. त्यामुळे शिंदे भाजपात जातात की भाजपच्या संजय कोकाटे यांना राष्ट्रवादीत घेतात ते पहावं लागेल. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील हेही उपस्थित होते.

COMMENTS