राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे तीन उमेदवार ठरले – सूत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे तीन उमेदवार ठरले – सूत्र

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्वाची बैठक झाली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. लोकसभा निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाली. काँग्रेससोबतचे लोकसभेचे जागावाटप आणि पक्षाच्या उमेदवारांबाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेच्या दोन वादग्रस्त जागांबाबत आज निर्णय घेतल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात उमेदवारीबात वाद होता. माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची उमेदवारी निश्चित होईल अशी चर्चा असतानाच अचानक माजी मंत्री भास्कर जाधव यांनीही उमेदवारीसाठी शड्डू ठोकले होते. मागच्या बैठकीत भास्कर जाधव बैठकीसाठी आले नव्हते. आजच्या बैठकीसाठी मात्र ते उपस्थित होते. शरद पवार यांच्यासोबत त्यांची एकांतात बैठक झाली. आणि त्यानंतर शरद पवार यांनी सुनिल तटकरे यांची उमेदवारी निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे गेल्यावेळी निसटता पराभव स्विकारलेले सुनिल तटकरे हे पुन्हा एकदा नशीब अजमावणार आहेत.

कोल्हापूर लोकसभेच्या उमेदवाराचीही असाच वाद होता. धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीला हसन मुश्रीफ यांच्यासह पक्षातल्या स्थानिक नेत्यांचा विरोध होता. त्यातही महाडिक यांची भाजपशी जवळीक वाढली होती. त्यामुळे कोल्हापुरात राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला हा प्रश्न पडला होता. शेवटी राष्ट्रवादीलाही महाडिकांसारखा तगडा उमेदवार नाही. तसंच बदलती हवा पाहून महाडिक यांनीही राष्ट्रवादीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता दोघांनाही पर्याय नसल्यामुळे शरद पवार यांनी स्थानिक नेत्यांची समजूत काढत महाडिक यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला आहे. आता काँग्रेसचे सतेज पाटील यावर काय भूमिका घेतात त्याकडं पहावं लागेल.

बारातमती मतदारसंघातून अर्थातच सुप्रिया सुळे यांच्या जागेवर शिक्कामोर्तब झालं आहे असं कळतंय. हा निर्णय अपेक्षितच होता. बारामतीच्या जागेचा वाद नव्हता. आता रायगड आणि कोल्हापूरनंतर सातारा आणि माढा या लोकसभा मतदारसंघात काय होणार याकडं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे. साता-यात स्थानिक आमदारांचा उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध आहे. तर माढ्यात विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह प्रभाकर देशमुख यांच्या नावाचीही चर्चा आहे.

COMMENTS