पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पार्थ पवार उतरणार का?, राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण!

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पार्थ पवार उतरणार का?, राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण!

पुणे – पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीचे प्रबळ दावेदार सारंग पाटील यांनी माघार घेतल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा सुरु होती. याबाबत राष्ट्रवादीने स्पष्टीकरण दिलं असून पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पार्थ पवार उतरणार नसल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांचा पराभव झाला होता. या पराभवाला सामोरे गेल्यानंतर पार्थ पवार गेल्या काही दिवसांपासून राजकारणात सक्रीय होताना दिसत आहेत. त्यामुळे ते ही निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. परंतु राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण आल्याने या चर्चेला आज अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. या निवडणुकीत पार्थ पवार पदवीधर मतदारसंघातून नशीब आजमवणार असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या होत्या, मात्र हे वृत्त राष्ट्रवादीने फेटाळून लावले आहे.

COMMENTS