राष्ट्रीय लोक अदालतीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद !

राष्ट्रीय लोक अदालतीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद !

नांदगाव – न्यायालयाच्या तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या माध्यमातून राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये दाखलपूर्व प्रकरणे व प्रलंबित प्रकरणे समजुतीसाठी ठेवण्यात आली होती. याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दर्शवला असून या अदालतीत तडजोडीच्या माध्यमातून  न्यायालयीन व विविध संस्थांची २ हजार ५१ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ८७७ प्रकरणांमध्ये तडजोडी झाल्या असून १४  लाख २८ हजार २७ रुपये एवढी वसुली झाली आहे. या वसुलीत सर्वाधिक ग्रामपंचायत कार्यालयाच्या २००० प्रकरणांपैकी  ८५४ प्रकरणांत तडजोडी होवून १४ लाख २५ हजार २७ रुपये वसूल करण्यात आले. तर न्यायालयाच्या प्रलंबित केसेस अंतर्गत मोटार वाहन कायद्यान्वये १६ प्रकरणात तडजोड होवून ३ हजार रुपये वसूल करण्यात आले. तसेच दिवाणी ३५ प्रलंबित प्रकरणांपैकी ७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.सूर्यकांत शिंदे यांच्या अधिपत्याखाली ‘ राष्ट्रीय लोक अदालत ‘ ही संकल्पना राबविण्यात आली असल्याचं दिवाणी व फौजदारी न्यायालयातील तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा प्रेरणा दांडेकर यांच्या यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यापूर्वी राष्ट्रीय लोक अदालतीद्वारे तालुक्यातील जळगाव खुर्द, गंगाधरी, कळमदरी आदी गावांमध्ये ‘ न्यायालय आपल्या दारी ‘ या प्रमाणे जनजागृती मोहीम राबविण्यात आली होती. ग्रामस्थांनी या संकल्पनेला प्रतिसाद देत भरभरून ‘ कर ‘ जमा केल्याने राष्ट्रीय लोक अदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यासाठी वकील तहसीलदार योगेश जमदाडे, नायब तहसीलदार मीनाक्षी बैरागी, गटविकास अधिकारी जे.टी.सूर्यवंशी, वकील संघाचे अध्यक्ष राजेंद्र दराडे,माजी अध्यक्ष व्ही.पी.आहेर आदींसह वकील संघाचे सदस्य, विधी स्वंयसेवकांनी परिश्रम घेतले होते.

COMMENTS