भाजपच्या बंडखोर आमदाराचा शिवसेनेत प्रवेश!

भाजपच्या बंडखोर आमदाराचा शिवसेनेत प्रवेश!

मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आज भाजपच्या बंडखोर नेत्या आणि मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईत मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गीता जैन यांच्यासोबत मीरा भाईंदर महानगरपालिकेतील काही नगरसेवकही प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ वाढणार आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीत गीता जैन यांनी भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता. त्यानंतर आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी महापौर असलेल्या जैन यांचं मीरा भाईंदरमध्ये कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहे. विधानसभा निवडणुकीत जैन यांना शिवसेनेने मदतही केली होती. त्यानंतर आता राज्यातील बदलती समिकरण लक्षात घेता जैन यांनी थेट शिवसेनेतच प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली आहे.

COMMENTS