उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अशासकीय सदस्य नियुक्त समित्या रद्द करण्याचा निर्णय – उदय सामंत

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अशासकीय सदस्य नियुक्त समित्या रद्द करण्याचा निर्णय – उदय सामंत

मुंबई – उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध समित्यांवर अशासकीय सदस्य नियुक्त केलेल्या समित्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. विधान भवनात उच्च व तंत्रशिक्षण विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय उपस्थित होते.

यावेळी सामंत म्हणाले, उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध समित्यांवर सदस्य म्हणून अशासकीय सदस्य (तज्ज्ञ मार्गदर्शक) नियुक्त केले जातात. त्या समित्या रद्द करुन नवीन अशासकीय सदस्य नियुक्त समित्या गठित करण्याचा प्रस्ताव तयार करावा. ग्रंथालयाची नव्याने पडताळणी करणे आवश्यक असून विभागांतर्गत असलेल्या राज्यातील ग्रंथालयाची पडताळणी करुन अत्याधुनिक सुविधासह ग्रंथालये असावेत. तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या महाविद्यालय, विद्यापीठे यांच्या रिकाम्या जागेवर अतिक्रमण झाले आहे ते तातडीने हटविण्याची कार्यवाही करावी आणि या जागेचा उपयोग करावा. तसेच जी महाविद्यालय, वसतीगृहे यांना 30 वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांचे संरचनात्मक लेखा परिक्षण (Structueal Audit) करावे, तसेच विद्यापीठाने रिक्त पदांचा अहवाल शासनाला तातडीने सादर करावा, अशा सूचनाही श्री.सामंत यांनी यावेळी केल्या.

तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देणे. हे विद्यापीठाचे कार्य आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन गुणवत्तेकडे लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेऊन तासिका, परीक्षा, निकाल यांचे योग्य नियोजन करुन वेळापत्रक तयार करावे, आणि वेळेमध्ये निकाल जाहीर करावा तसेच वार्षिक अहवाल शासनाला सादर करावा, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

COMMENTS