काॅंग्रेस पक्ष बांधणीसाठी नाना अॅक्टिव्ह मोडवर

काॅंग्रेस पक्ष बांधणीसाठी नाना अॅक्टिव्ह मोडवर

मुंबई – काॅंग्रेस प्रदेशाध्यक्षाचा पदभार स्विकारल्यापासून नाना पटोले काॅंग्रेस पक्ष आक्रमक झाला असून काँग्रेसने आगामी नगरपालिका निवडणुका तसंच अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महत्वपूर्ण बैठकीचं आयोजन केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आयोजत केली आहे. या बैठकीत आगामी काळातील पक्षाची दिशा ठरवण्यात येणार आहे.

राज्यातील आगामी 5 महानगरपालिका तसेच 98 नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बांधणीसंदर्भात प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात आलं आहे. तसेच सध्या देशात शेतकरी आंदोलन कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात आंदोलन व जनजागृती मोहीमेची रणनीती काँग्रेसकडून आखण्यात येणार आहे. पक्ष संघटना बळकटीसाठी 24 ते 26 फेब्रुवारीला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठका होणार आहेत. या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह निवड मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.

मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता नवी मुंबई शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, दुपारी 12 वाजता कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, दुपारी 2 वाजता वसई विरार जिल्हा काँग्रेस कमिटी आणि दुपारी 4 वाजता कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक घेतली जाणार आहे.

दुसरीकडे, गुरुवारी औरंगाबाद ग्रामीण व शहर, भंडारा, गोंदिया व ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक होत आहे. शुक्रवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी यवतमाळ, चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक घेऊन संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला जाणार आहे तर संध्याकाळी 4 वाजता भिवंडी येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

COMMENTS