वर्षावरील बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये या विषयावर झाली चर्चा?

वर्षावरील बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये या विषयावर झाली चर्चा?

मुंबई – पंतप्रधान मोदी आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि  शिवसेना खासदार संजय राऊत उपस्थित होते. जवळपास तासभर ही बैठक चालली.

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सीएएबाबत सकारात्मक भूमिका मांडली होती. उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर महाविकास आघाडीत मतमतांतरे होत आहेत. काँग्रेसने सीएए, एनआरसी आणि एनपीए कायद्याला जाहीर विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या कायद्यावरुन आघाडीतील सत्ताधारी तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

तर दुसरीकडे भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेच्या तपासावरुनही काहीशी मतमतांतरे आहेत. भीमा कोरेगावचा तपास एनआयएला दिला आहे. मात्र तपास राज्यातील विशेष तपास पथकाद्वारे व्हावा अशी भूमिका राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे या भेटीत त्याबाबतही चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे.

तसेच राज्य विधीमंडळाचं अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. शिवाय अधिवेशनात कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा व्हावी, विरोधकांचा सामना कसा करायचा याबाबतची रणनीतीही या बैठकीत आखण्यात आली असल्याची माहिती आहे.

COMMENTS