कोकणात भाजपला धक्का, माजी आमदार रमेश कदम काँग्रेसमध्ये !

कोकणात भाजपला धक्का, माजी आमदार रमेश कदम काँग्रेसमध्ये !

मुंबई  – कोकणातील भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी आमदार रमेश कदम तसेच सिंधुदुर्ग शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख वसंत केसरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कृष्णा खेडेकर, खेड नगरपालिकेचे माजी अध्यक्ष बाबा पाटणे यांच्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुंबईतील टिळकभवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी खा.हुसेन दलवाई, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,जयवंतराव आवळे, आ.भाई जगताप, प्रदेश काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे,प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व रत्नागिरीचे प्रभारी विश्वनाथ पाटील, प्रदेश सरचिटणीस माजी आमदार माणिकराव जगताप, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास सावंत यांच्यासह काँग्रेस नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रंसगी बोलताना रमेश कदम म्हणाले वयाच्या १८ व्या पासून मी काँग्रेस पक्षातून राजकारणाची सुरुवात केली होती. राजकारणात विविध पक्षात काम केल्यानंतर तेथील कार्यपध्दती पाहिल्यानंतर आपल्या घरचा काँग्रेस पक्षच अधिक चांगला हे लक्षात आले. त्यानुसार आज मी माझ्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे.  यापुढे रत्नागिरी व कोकणात काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी आम्ही जुना-नवा वाद निर्माण न करता एकदिलाने काम करु. येत्या महिनाभरात रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचा भव्य मेळावा घेण्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले.

यावेळी खा.अशोकराव चव्हाण यांनी आ.रमेश कदम व त्यांच्या सहकाऱ्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले रमेश कदम यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे कोकणात पक्षाची ताकद वाढेल. मध्यंतरीचा काही काळ वगळता कोकण हा नेहमीच काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. यापुढे आपण प्रामाणिक व एकजुटीने काम केल्यास निश्चितच कोकणात काँग्रेसला चांगले यश मिळू शकते असा विश्वास यावेळी चव्हाण यांनी व्यक्त केला.

COMMENTS