कोकण पदवीधर मतदारसंघासाठी इच्छुकांची गर्दी !

कोकण पदवीधर मतदारसंघासाठी इच्छुकांची गर्दी !

मुंबई– विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी इच्छुकांची गर्दी वाढत असल्याचं दिसून येत आहे.या निवडणुकीचं बिगूल वाजताच सर्वच पक्ष उमेदवार निवडीच्या तयारीला लागले आहेत. भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पदवीधर मतदारसंघाचे निरंजन डावखरे हे आमदार असून त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच त्यानंतर भाजपने डावखरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू या मतदारसंघातून भाजपतर्फे इच्छुक होते. परंतु डावखरे भाजपत गेल्यामुळे विनय नातू यांची उमेदवारी गेली असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान राष्ट्रवादीकडून ठाण्यातील ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांचे नाव चर्चेत आहे. कोकण शिक्षक मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीने शेकापला सोडली होती. ही जागा राष्ट्रवादीने शेकापसाठी सोडल्यास शेकाप नेते जयंत पाटील यांच्या सून चित्रलेखा पाटील या रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. तर शिवसेनेकडून ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांचे नाव चर्चेत आहे. शिवसेनेने उमेदवार उभा केल्यास निवडणूक चुरशीची होणार आहे.तसेच या निवडणुकीत नारायण राणे, हितेंद्र ठाकूर यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे ते कोणाला पाठिंबा देतात, याकडेही लक्ष लागलं आहे.

दरम्यान या मतदारसंघात सर्वाधिक मतदार ठाणे जिल्ह्यातील, तर सर्वांत कमी मतदार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील उमेदवार देण्यावर सर्वपक्षीयांनी भर दिला असल्याचं दिसून येत आहे.

 

COMMENTS