भाजपच्या नितेश राणेंविरोधात शिवसेनेने दिला उमेदवार!

भाजपच्या नितेश राणेंविरोधात शिवसेनेने दिला उमेदवार!

मुंबई – आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख आहे. त्यामुळे राज्यभरातील अनेक नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपाने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पूत्र नितेश राणे यांना उमेदवारी दिली आहे. गुरूवारी भाजपात प्रवेश केल्यानंतर शुक्रवारी त्यांना एबी फॉर्म देण्यात आला. त्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

दरम्यान शिवसेनेचा तीव्र विरोध असतानाही भाजपने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना पक्षात प्रवेश देऊन कणकवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना-भाजप युतीत वादाची ठिणगी पडली आहे. कारण भाजपा-शिवसेनेची युती असताना शिवसेनेने स्वतःचा उमेदवार नितेश राणेंविरोधात मैदानात उतरवला आहे.  शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नितेश राणे विरुद्ध सतीश सावंत असा सामना रंगणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान सतीश सावंत हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. नारायण राणे यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले सावंत काही दिवसांपूर्वीच राणेंची साथ सोडून शिवसेनेत आले आहेत. नितेश यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला होता. सतीश सावंत यांना कणकवली ग्रामीण भागातून मोठे समर्थन आहे. जिल्हा परिषदेच्या हरकुळ बुद्रुक गटातून त्यांनी सलग तीनवेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजणार असल्याचं दिसत आहे..

COMMENTS