जानकर-पवार भेटीने नव्या समिकरणांची चर्चा

जानकर-पवार भेटीने नव्या समिकरणांची चर्चा

सातारा (स्वप्नील शिंदे) : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघा़डीकडून भाजपचा दारूण पराभव झाला. महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष भाजपचा घटकपक्ष आहे. गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या सोशल इंजिनिअरिंगमध्ये जानकर भाजपसाठी धनगर समाजाचा चेहरा होते. या समीकरणाचा भाजपला अनेक मतदारसंघात फायदा झाला. परंतु सध्या भाजप पक्ष संघटनेवर देवेंद्र फडणवीस यांचे संपूर्ण नियंत्रण आहे. त्यामुळे घटकपक्षाची साथ घेण्याऐवजी आपल्याच पक्षातून नेतृत्व उभं करण्याच्या दृष्टीकोनातून गोपीचंद पडळकर यांना ताकद दिली जात आहे.  घटकपक्षाची गरज उरणार नाही आणि नेतृत्वही आपल्या नियंत्रणात राहील, असा विचार यामागे असू शकतो. त्यामुळे अडगळीत पडलेल्या जानकरांनी पवारांची भेट घेऊन नव्या राजकीय समिकरणांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केल्याची चर्चा रंगत आहे.

राष्ट्रीय समाज पार्टीचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेस उधाण आलं आहे. ही भेट साखर कारखान्याच्या प्रश्नाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. परंतु सध्याची राजकीय परिस्थितीत पाहता जानकर महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार सां असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.

नुकत्याच झालेल्या विधानपरिषदांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले आहे.  त्यातही देवेद्र फडणवीस यांच्याकडून धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना ताकद दिली जात आहे. त्यामुळे भाजपला जानकरांची गरज उरली नाही. जानकरांच्या पक्षाचा एकच आमदार असला तरी ते मात्र, स्वत: सत्तेच्या पदापासून दूर आहेत. तसेच त्यांच्या पक्षाचं कामही थंडावलं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना पुन्हा जोमाने उभे करण्यासाठी जानकरांकडून जुळवाजुळव करण्याची शक्यता राजकीय निरीक्षक वर्तवत आहेत.

.

COMMENTS