एकनाथ खडसेंकडून पवारांचं कौतुक, सरकारला घरचा आहेर !

एकनाथ खडसेंकडून पवारांचं कौतुक, सरकारला घरचा आहेर !

जळगाव – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. राज्यातील शेतक-यांनी सरकारच्या भरोशावर राहू नये, स्वतःच्या पायावर उभे रहावे असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे. जळगावातील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी शेतक-यांना हा सल्ला दिला असून यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचंही भरभरून कौतुक केलं आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंची पावलं राष्ट्रवादीच्या दिशेने जात आहेत की काय याबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

 

 

दरम्यान राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ शकलेले नाही. त्यामुळे या शेतक-यांचा अपेक्षाभंग झाला असून मध्यस्थ, दलाल आणि व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी सरकारच्या भरवशावर राहू नये. त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे, शेतकऱ्यांच्या हक्काची कंपनी स्थापन करावी असा सल्ला खडसे यांनी दिला आहे. यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक करत बारामतीमध्ये शरद पवार यांनी कृषिक्षेत्रात संधोशन करुन मोठे बदल घडवले आहेत. त्यामुळे मलाही बारामतीमध्ये जाऊन राहावे असं वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. खडसेंनी केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

COMMENTS