धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर शरद पवारांचे रोखठोक भाष्य

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर शरद पवारांचे रोखठोक भाष्य

मुंबई – महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर स्वतः धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या खासगी आयुष्याविषयी स्पष्टीकरण दिल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर भाष्य केले आहे. मुंडेंवरील बलात्काराचे आरोप हे गंभीर आहेत. एक पक्ष म्हणून याचा गांभीर्याने विचार करावा लागेल, असे पवार म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले की, ‘धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. एक पक्ष म्हणून या सगळ्याचा आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल. पक्षातील प्रमुख सहकाऱ्यांशी बोलणे झाल्यावर, त्यांना विश्वासात घेऊन मुंडेंनी मला दिलेली माहिती त्यांच्यापुढे मांडणार आहे. त्यानंतर आम्ही धनंजय मुंडे यांच्याबाबत निर्णय घेऊ’, असे पवार म्हणाले.

विशष म्हणजे, शरद पवारांनी धनंजय मुंडेंबाबत रोखठोक मत मांडले असले, तरी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची पाठराखण केली आहे. ‘नवाब मलिक हे राज्यातील महत्त्वाच्या मंत्र्यांपैकी एक आहेत. 25 वर्षांहून अधिक काळ ते विधिमंडळात आहेत. या काळात त्यांच्यावर एकदाही कोणतेही वैयक्तिक स्वरुपाचे आरोप झालेले नाहीत. त्यांच्या नातेवाईकावर आरोप झाले आहेत. त्या नातेवाईकाला संबंधित यंत्रणेने अटक केली आहे. आता एनसीबीने वस्तुस्थिती समोर आणणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी मांडले. या दोन्ही प्रकरणात राष्ट्रवादीच्या प्रतिमेला धक्का पोहचत असल्याने शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS