काकांकडून पुतण्याला दुसरा धक्का

काकांकडून पुतण्याला दुसरा धक्का

बीड : महाराष्ट्राच्या राजकारणाला काका-पुतण्याच्या संघर्षाची किनार असलेली आपण अनेक वेळा पाहिले आहे. या राजकीय संघर्षात कधी काका तर कधी पुतण्या मात करीत असतो. बीड जिल्ह्यातही ही परंपरा काय असून विधानसभेच्या निवडणुकीत पुतण्याने काकांना धूळ चारली. त्यानंतर नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काकांनी बाजी मारली. आता पुन्हा एकदा काकांनी पुतण्याच्या गटातील चार नगरसेवकांना आपल्या गोट्यात ओढून पुतण्याला दुसरा धक्का दिला आहे.

बीड जिल्ह्यातील चार नगरसेवकांनी पुतण्याला रामराम ठोकून काकाचे नेतृत्व मान्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या गटाचे चार नगरसेवक आता माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गटामध्ये सामील झाले आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचा एक नगरसेवक शिवसेनेमध्ये गेला होता. त्यांच्या पाठोपाठ आता चार नगरसेवक राष्ट्रवादीला सोडून गेल्यानेर आमदार पुतण्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एक वर्षांपूर्वी विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर संदीप क्षीरसागर आमदार झाले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्या मागे ताकद दिल्याने पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी संदीप शिरसागर यांच्या मागे मोठं बळ उभं केलं. आता संदीप क्षीरसागर यांच्याकडून डावलले जात असल्याची भावना या नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब गुंजाळ यांचा शिवसेनेत प्रवेश झाला होता. त्यानंतर नगरसेवक गणेश तांदळे, प्रभाकर पोपळे, रणजित बनसोडे आणि भैयासाहेब मोरे यांनी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. बीडच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आमदार संदीप क्षीरसागर गटाचे 20 नगरसेवक होते, त्यापैकी आतापर्यंत आठ नगरसेवकांनी संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाला सोडचिठ्ठी दिली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील चार नगरसेवक हे शिवसेनेमध्ये डेरेदाखल झाल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

COMMENTS