बंदमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार, बुलडाण्यात रेल्वे रोखली

बंदमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार, बुलडाण्यात रेल्वे रोखली

मुंबई – कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये महाराष्ट्रातील अनेक शेतकरी संघटनांसह सत्ताधारी राजकीय पक्ष देखील सहभागी झाले आहेत. बंदला पहाटेपासूनच सुरुवात झाली असून सर्व बाजार समित्यांमधील व्यवहार ठप्प ठेवण्यात आले आहे. दरम्यान, बुलडाण्यात मलकापूर रेल्वे स्थानकावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात चेन्नई -अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस अडवून कायद्याचा निषेध केला.

कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकरी संघटनांनी जाहीर केलेल्या देशव्यापी बंदला राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी पाठिंबा दिला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीही यात सहभागी होणार असून माथाडी, व्यापारी शंभर टक्के सहभागी झाले. मार्केट मध्ये भाजीपाल्याची आवक घटली.

बंदला राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर माथाडी कामगारांनीही पाठिंबा जाहीर केल्याने नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील बाजार समित्याही बंद राहतील. संवेदनशील भागांमध्ये एसटी सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील रेल्वे, बेस्ट, रिक्षा-टॅक्सी सुरू राहण्याची चिन्हे आहेत. हा बंद राजकीय नसल्याने कोणीही सर्वसामान्य नागरिकांवर बंदची सक्ती करू नये, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी बंदला पाठिंबा जाहीर के ल्याने बंद कडकडीत पाळला. पोलिस प्रशासनाच्यावतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

COMMENTS