लोकांसाठी जगलेला नेता गेला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वाहिली अनिल राठोड यांना श्रद्धांजली!

लोकांसाठी जगलेला नेता गेला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वाहिली अनिल राठोड यांना श्रद्धांजली!

अहमदनगर – शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधन झाले. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र त्यांना हृदयविकाराचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर आज पहाटे सहा वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

अनिल राठोड यांनी अहमदनगर शहर मतदारसंघात सलग 25 वर्ष लोकप्रतिनिधित्व केले होते. शिवसेनेच्या तिकिटावर 1990 ते 2014 अशा सलग पाच टर्म ते आमदारपदी निवडून आले होते. 2009 मध्ये त्यांच्याकडे शिवसेना उपनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. शिवसेना-भाजप महायुती सरकारच्या काळात त्यांच्याकडे महसूल राज्यमंत्रीपदाची धुरा होती.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल राठोड यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अनिल भैया गेले ही वाईट बातमी कळली आणि धक्काच बसला. शिवसेना ज्यांच्या रक्तात होती आणि प्रत्येक श्वास हा शिवसेनेसाठी होता. तो अखेर काळाने निष्ठूरपणे थांबविला, अशा भावपूर्ण शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच युती सरकारच्या काळात मंत्रीमंडळात असलेले अनिल भैया राठोड म्हणजे हिंदुत्वाचा बुलंद आवाज होते. रस्त्यावर स्वत: उतरून लोकांच्या प्रश्नांसाठी काम करणे या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी शिवसेना नगर जिल्ह्यात अक्षरश: रुजविली. लोकांसाठी आंदोलने केली, त्यांच्या समस्यांची तड लावली.

नगर शहरात तर त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले आणि ते यशस्वी करून दाखवले. नगर जिल्ह्यातून २५ वर्षे सतत आमदार म्हणून निवडून येत असले तरी रस्त्यावरचा सामान्य कार्यकर्ता अशी ओळख सांगण्यात त्यांना अभिमान होता. कुठलाही अहंकार नसलेला आणि आपला जन्मच मुळी लोकांसाठी झालेला आहे, असे समजणा-या अनिल भैया यांच्या जाण्याने शिवसेनेतील आमच्या अत्यंत विश्वासू सहकारी, कट्टर शिवसैनिक आम्ही गमावला असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS