पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा, वाचा औरंगाबाद आणि पुणे विभागातून कोणाला दिली उमेदवारी!

पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा, वाचा औरंगाबाद आणि पुणे विभागातून कोणाला दिली उमेदवारी!

मुंबई – विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. औरंगाबाद विभागातून राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण तर पुणे विभागातून अरुण लाड यांच्या नावाची घोषणा महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विधानपरिषदेसाठी उमेदवार कधी जाहीर करणार याची उत्सुकता लागली असतानाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सतीश चव्हाण आणि अरुण लाड यांच्या नावाची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीने जाहीर केलेले दोन्ही उमेदवार या निवडणूकीत विजयी होतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या उमेदवारीवरून सुरुवातीला नागपूर आणि औरंगाबादमध्ये आघाडीत बिघाडी पहायला मिळाली. दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना सहकार्य करण्यास तयार नसल्याची माहिती होती. एवढेच नव्हे तर दोन्ही ठिकाणी परस्परांविरोधात बंडखोर उमेदवार उभे केले जाण्याची शक्यताही वर्तवली जात होती. नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकासआघाडीकडून काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, हा मतदारसंघ काँग्रेसला सोडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याची माहिती समोर आली होती. तर दुसरीकडे औरंगाबादमध्येही महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की नाही, यावरून काँग्रेसचे अद्याप तळ्यात-मळ्यात सुरु आहे. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश चव्हाण यांना उमेदवारी मिळाली आहे. परंतु, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतही काँग्रेसने अद्याप राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीवेळी काँग्रेस नेते काय भूमिका घेतात, याकडेही लक्ष लागलं आहे.

महाविकास आघाडीनंतर पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीनंही आपले उमेदवार जाहीर केले आहेत. औरंगाबाद, पुणे आणि नागपूरच्या पदवीधर निवडणुकांसाठी औरंगबादमधून नागोराव पांचाळ, पुण्यातून सोमनाथ साळुंखे, नागपुरातून राहुल वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातून वंचितने सम्राट शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS