धुळे महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे चंद्रकांत सोनार यांची बिनविरोध निवड !

धुळे महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे चंद्रकांत सोनार यांची बिनविरोध निवड !

धुळे – धुळे महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे चंद्रकांत सोनार तर उपमहापौरपदी भाजपच्याच कल्याणी अंपळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतल्यामुळे या दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 74 पैकी 50 जागा जिंकत भाजपने महापालिकेवर सत्ता मिळवली आहे.

दरम्यान शहर विकासासाठी जनतेने भाजपला कौल दिला आहे. त्यामुळे उमेदवारी माघार घेत असल्याचे व भाजपला पाठिंबा देत असल्याचे गटनेते कमलेश देवरे यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यामुळे भाजपचे चंद्रकांत सोनार यांची महापौरपदी तर कल्याणी अंपळकर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचं घोषित करण्यात आलं आहे.

दरम्यान धुळे महापालिकेची निवडणूक राज्यभर गाजली होती. विशेष म्हणजे भाजपमधील अतर्गत वाद चांगलाच चव्हाट्यावर आला होता. भाजपमध्ये गुंडांना उमेदवारी दिली असा आरोप करून भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी बंड पुकारलं होतं. अनिल गोटे यांनी लोकसंग्राम नावाचा पक्ष स्थापन केला होता. अनिल गोटे यांनी बंडखोरी केल्यानं धुळे महापालिकेची निवडणूक राज्यभर गाजली. गोटे यांनी आपल्या घरात पत्नी हेमा आणि मुलगा तेजस गोटेला उमेदवारी देऊन मैदानात उतरवलं. पण धुळेकर जनतेनं भाजपच्या पारड्यात मतं टाकत अनिल गोटे यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीला साफ नाकारलं असल्याचं पहावयास मिळालं.

या निवडणुकीत अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला एका जागेवर समाधान मानावं लागलं. तसेच या निवडणुकीत काँग्रेसला 6 तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 8 जागा आल्यात. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी 34 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

 

COMMENTS