सरकारने तीन वर्षात शेतकऱ्यांवर दरोडा टाकला – धनंजय मुंडे

सरकारने तीन वर्षात शेतकऱ्यांवर दरोडा टाकला – धनंजय मुंडे

मुंबई – शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादीने बीड जिल्ह्यात नुकताच मोर्चा काढला. या मोर्चानंतर भाजपच्या जिल्हा नेत्यांनी आम्हाला दरोडेखोर म्हटले. आम्हाला दरोडेखोर म्हणणाऱ्यांनी तीन वर्षापूर्वीचे शेतीमालाचे भाव अन्‌ आजच्या शेतीमालाच्या भावाचा अभ्यास करावा. त्यावेळीपेक्षा आत्ता सोयाबीनला क्विंटलमागे तब्बल दोन हजारांनी कमी भाव मिळत आहे. कापूस, मुग व उडीद या पिकांच्या भावातही तेंव्हाच्या तुलनेत कमी भाव मिळत आहे. हा सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांवर टाकलेला दरोडाच असल्याचा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. बीड शहरातील विघ्नहर्ता हॉटेलच्या सभागृहात नुकताच जयभवानी कारखान्याच्या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभुमीवर आमदार अमरसिंह पंडित यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सरकारकडून सेलीब्रेशन करण्यात येत असून मुख्यमंत्री व इतर काही मंत्री आम्ही काय काय केले हे सांगत आहेत. प्रत्यक्षात ठोस काहीही न करताही ते काहीतरी करून दाखविल्याचे सांगत असून तेवढे कौशल्य मुख्यमंत्र्यांमध्ये असल्याची मिश्कील टिपण्णी त्यांनी केली. मात्र एकीकडे असे सुरू असताना दुसरीकडे जिल्ह्यातील भाजप नेतृत्वाने आपण काय केले हे सांगण्याऐवजी पालकमंत्री जयभवानी कारखाना सुरू होऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहेत. शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी तसेच ऊसतोड मजुरांची संख्या कमी करण्यासाठी भरीव प्रयत्न झाले असते तर त्रिवर्षपूर्तीचे सेलीब्रेशन समजु शकलो असतो असा टोलाही त्यांनी पालकमंत्री पंकजा मुंडेंना लगावला. जयभवानी कारखाना सुरू होतोय. तो सुरू होऊ नये म्हणून परिश्रम घ्यायचे ही परंपरा पालकमंत्र्यांनी बंद करायला हवी. पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरून त्यांची सत्ता असलेल्या जिल्हा बँकेने जाणीवपूर्वक आदरणीय शिवाजीराव पंडितांवर गुन्हा दाखल केला आहे. कोणीच कायम सत्तेत राहत नाही. उद्या सत्ता बदलल्यावर आत्ताचे विरोधकही तुमच्या विरोधात सत्तेचा वापर करू शकतात याचे भान ठेवण्याचा सल्ला पालकमंत्र्यांना देत जिल्हा बँकेला करायचाच झाला तर वैद्यनाथ कारखान्याच्या संचालक मंडळाविरूद्धही गुन्हा दाखल होऊ शकतो असा इशाराही धनंजय मुंडेंनी दिला. केंद्रात, राज्यात तसेच जिल्हा बँकेत व जिल्हा परिषदेत वरपासून खालपर्यंत भाजपची सत्ता आहे. असे असतानाही पालकमंत्र्यांना जिल्हा बँक सुस्थितीत आणता आली नाही किंवा बँकेला विदर्भातील बँकांप्रमाणे मदत मिळवून देता आली नाही. देण्यासाठी सर्व सत्तास्थाने असतानाही तुम्ही जनतेला काही देऊ शकत नाही. परंतु का दिले नाही? असे प्रश्न विचारणाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न केले जातात हे राजकारण पालकमंत्र्यांनी बंद करावे. जिल्हा बँकेतील सत्तेचा गुन्हे दाखल करण्यासाठी वापर करण्याऐवजी या सत्तेचा वापर शेतकऱ्यांच्या जिवनात आर्थिक क्रांती होण्यासाठी करावा अशी अपेक्षा करीत असाच वापर केला तर चिक्की प्रकरणापासून लहान मुलांच्या वजन-मापेपर्यंत गुन्ह्यांची श्रृंखला जाईल असा सूचक टोलाही यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री पंकजा मुंडेंना लगावला.

COMMENTS