धनंजय मुंडेंनी दिलेला शब्द पाळला

धनंजय मुंडेंनी दिलेला शब्द पाळला

बीड – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केल्याने ते अडचणी सापडले होते. अशावेळी त्यांच्या पाठीशी महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि नेते उभे राहिले होते. अशा वेळी विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. अशा प्रकारे ते संकटात असताना त्यांनी शिवसेनेला दिलेला शब्द पाळा आहे

धनंजय मुंडे यांनी परळी नगर परिषदेच्या सभापती निवडींमध्ये महाविकास आघाडीचा धर्म पाळत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असूनही शिवसेनेच्या एकमात्र नगरसेविकेस सभापती पद दिले आहे. परळी नगरपरिषदेच्या विषय समित्यांची आज फेरनिवड संपन्न झाली. या फेरनिवडीमध्ये धनंजय मुंडे यांनी सर्व जाती-धर्मांवर न्याय करतच महाविकास आघाडीच्या धर्माचेही पालन केल्याचे दिसून आले.

परळी नगरपरिषदेत एकूण ३२ निवडून आलेले व ३ स्वीकृत असे एकूण ३५ नगरसेवक आहेत. यापैकी जवळपास ३० नगरसेवक एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तर श्रीमती गंगासागर शिंदे या एकमेव शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. विषय समित्यांच्या फेरनिवडणुकीत शिवसेनेच्या एकमात्र नगरसेविका श्रीमती गंगासागर बाबुराव शिंदे यांना महिला व बालविकास सभापती पद देण्यात आले. याशिवाय अन्नपूर्णा आडेपवार यांना बांधकाम, उर्मिला गोविंद मुंडे यांना पाणीपुरवठा, शेख अन्वरलाल यांना स्वच्छता समिती, गोपाळकृष्ण आंधळे यांना शिक्षण समिती या सर्व सभापती पदांसह स्थायी समितीवर बाजीराव भैय्या धर्माधिकारी, शहाजहान बेगम समीउल्ला खान व श्रीमती रेश्मा बळवंत यांच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या आहेत.

यावेळी नगराध्यक्षा सरोजनीताई हालगे, उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, न.प. मुख्याधिकारी अरविंद मुंडे तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी श्रीमती नम्रता चाटे यांनी या प्रक्रियेत पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.
दरम्यान एकीकडे आपल्यावर झालेल्या आरोपांचा सामना करत असताना धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीत एकेरी वर्चस्व मिळवले. त्यापाठोपाठ आता नगर परिषद विषय समित्यांच्या निवडींमध्ये महाविकास आघाडीचा धर्म पाळून व सर्व जाती धर्मांना समान न्याय देण्याची भूमिका बजावली.

COMMENTS