सातपिढीचा दुष्काळ असलेल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार, पहिल्याच यादीत बीड जिल्ह्यातील ७०० शेतकऱ्यांचा समावेश – धनंजय मुंडे

सातपिढीचा दुष्काळ असलेल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार, पहिल्याच यादीत बीड जिल्ह्यातील ७०० शेतकऱ्यांचा समावेश – धनंजय मुंडे

मुंबई – महाविकासआघाडी सरकारच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या १५ हजार लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी आज जाहीर झाली. एप्रिल अखेरपर्यंत टप्प्याटप्प्याने याद्या जाहीर होऊन सर्व शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. जिल्हा पातळीवर अंमलबजावणीचे काम सुरू झाले आहे. बळीचं राज्य आलं! सातपिढीचा दुष्काळ असलेल्या आमच्या भागातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पहिल्याच जाहीर करण्यात आलेल्या यादीत बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांचे नाव समाविष्ट आहे. त्यामुळे कायम दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आमच्या भागातील शेतकऱ्याला या कर्जमाफीमुळे नक्कीच दिलासा मिळेल असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त करत या योजनेचे स्वागत केले आहे.

महा विकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ठरवण्यात आलेल्या किमान समान कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफी हा मुद्दा अग्रणी होता. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना आखून २ लाखांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला आता सुरुवात झाली असून आज राज्यातील १५००० लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी घोषित करण्यात आली आहे.

सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यात व विशेषकरून बीड जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने या योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱयांना मिळेल, महाविकास आघाडी सरकारच्या रूपाने खऱ्या अर्थाने बळी राजाचे राज्य येऊन शेतकरी सुखावेल, असा आमचा प्रयत्न राहणार आहे. तसेच २ लाखपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीतही वेगळा निर्णय घेऊन कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचेही मुंडे यांनी म्हटले आहे.

COMMENTS