धनंजय मुंडेंनी घेतला जिल्हा पुरवठा विभागाचा आढावा, धान्य वाटप तात्काळ सुरू करण्याचे निर्देश !

धनंजय मुंडेंनी घेतला जिल्हा पुरवठा विभागाचा आढावा, धान्य वाटप तात्काळ सुरू करण्याचे निर्देश !

बीड – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोना लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अन्न – धान्याचा तुटवडा होऊ नये या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा विभागाचा तालुकानिहाय आढावा घेतला. राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुढील तीन महिन्यांकरिता जिल्ह्यातील सर्व पात्र लाभधारकांना २ रुपये प्रति किलो प्रमाणे गहू व ३ रुपये प्रति किलो प्रमाणे तांदूळ या भावाने प्रति माणसी प्रति महिना ३ किलो गहू व २ किलो तांदूळ प्रमाणे तर प्रधानमंत्री गरीब कुटुंब कल्याण योजनेतील लाभार्थ्यांना प्रति माणसी ५ किलो तांदूळ मोफत याप्रमाणे धान्य वाटपास तात्काळ सुरुवात करावी असे निर्देश मुंडे यांनी पुरवठा विभागास दिले आहेत.

यानुसार जिल्ह्यात उपलब्ध धान्य साठ्याची व विविध योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची मुंडेंनी तालुकानिहाय माहिती घेतली. जिल्ह्यात या चार योजनांचे मिळून २२ लाखांहून अधिक लाभार्थी आहेत. पुरवठा विभागाकडे गव्हाचा मुबलक साठा असून शासनाकडून दर महिन्याला ८ हजार टन (८० हजार क्विंटल) इतके तांदूळ प्राप्त होत असून एप्रिल महिन्यात वाटप करण्यात येणारे ८ हजार टन तांदूळ पुरवठा विभागास प्राप्त झाले आहेत. तसेच त्याचे वाटप त्वरित करण्यात येणार असून मे व जुन महिण्यासाठीचे प्रत्येकी ८ हजार टन तांदूळही लवकरच प्राप्त होतील असे जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. प्रकाश आघाव पाटील यांनी सांगितले.

अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंब, एपीएल कार्ड धारक लाभार्थ्यांना हे धान्य गहू प्रति माणसी ३ किलो (प्रतिकिलो २ रुपये) प्रमाणे तर तांदूळ प्रति माणसी २ किलो (प्रतिकिलो ३ रुपये) प्रमाणे तसेच प्रधानमंत्री गरीब कुटुंब कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत ५ किलो तांदूळ यानुसार वाटप करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाभर अधिकची वाहने व आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून त्या – त्या तहसील मार्फत स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहोच होऊन प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत ८ दिवसांच्या आत वाटपास सुरुवात व्हावी असे पालकमंत्री ना. मुंडे यांचे निर्देश असून त्यानुसार तात्काळ प्रत्यक्ष वाटपास सुरुवात केली जाईल असे श्री. आघाव पाटील यांनी सांगितले.

एप्रिल महिन्यात सर्व ११ तालुक्यातील २२ लाखांहून अधिक नागरिकांना या धान्य वाटपाचा लाभ मिळणार आहे.

दरम्यान या संकटाच्या काळात आपण जिल्हा वासीयांच्या पाठीशी असून, जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र व गरजू घटकापर्यंत एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे धान्य राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे पोहोचावे याबाबत आपण जिल्हा पुरवठा विभागास सक्तीचे निर्देश दिले असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

रेशन कार्ड नसलेल्या गरजू नागरिकांसाठी तालुकानिहाय तहसीलदारांच्या अखत्यारीत विविध सेवाभावी संस्थांच्या मार्फत विहित भावातच धान्य वाटप करण्यात यावे असेही ना. मुंडे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निर्देशित केले आहे.

उज्वला योजनेतील सर्व लाभार्थ्यांना तीन महिने मोफत गॅस सिलेंडर

केंद्र सरकारने घोषित केल्याप्रमाणे उज्वला गॅस योजनेतील सर्व लाभधारकांना एप्रिल, मे व जून असे तीन महिने प्रति महिना एक प्रमाणे गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. गॅस सिलेंडरची रक्कम दर महिन्याला लाभधारकांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. याचीही काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी तसेच गॅस सिलेंडरचा तुटवडा भासणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी असेही मुंडे यांनी निर्देशित केले आहे.

COMMENTS