अर्थसंकल्पीय अधिवेशन, त्यामुळे आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला – धनंजय मुंडे

अर्थसंकल्पीय अधिवेशन, त्यामुळे आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला – धनंजय मुंडे

 

मुंबई – राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली आहे. प्रथेप्रमाणे राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात झाली. पण विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला व अनुपस्थित राहिले. भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेस-राष्ट्रवादीने अभिभाषणावर बहिष्कार घातला. राज्यपालांनी विधिमंडळात प्रवेश करताच विरोधकांनी ‘गांधी हम शर्मिंदा है, तेरे कातील जिंदा है’, अशी घोषणाबाजी केली.

दरम्यान राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. पण काही दिवसांपूर्वी राज्यपाल विद्यासागर राव यांनी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असून मला त्याचा अभिमान आहे असे वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यपाल म्हणून आजच्या अभिभाषणात ते राज्यातील जनतेच्या हिताची, कल्याणाची भूमिका मांडणार आहेत की, संघाचा कार्यकर्ता म्हणून अजेंडा राबवणार ? याबाबत विरोधी पक्षांच्या मनात संशय असल्याने आम्ही त्यांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला असल्याचं विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

तसेच सहा दिवस हे अधिवेशन चालणार असून शेतकऱ्यांना कर्जमाफी, नोकरभरती, दुष्काळ आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरुन विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे या अधिवेशनाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS