धनंजय मुंडेंच्या मागणीला यश,  बीड आणि अंबाजोगाईसाठी नवीन अप्पर जिल्हाधिकारी नियुक्त !

धनंजय मुंडेंच्या मागणीला यश, बीड आणि अंबाजोगाईसाठी नवीन अप्पर जिल्हाधिकारी नियुक्त !

बीड – बीड जिल्ह्यातील दोन महत्वाच्या रिक्त पदांवर राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत अपर जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीड व अंबाजोगाई ही दोन अपर जिल्हाधिकारी पदे गेली अनेक दिवस रिक्त होते. याबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी महसूल विभागाकडे पाठपुरावा केला होता.

बीड जिल्ह्यातील प्रशासकीय कारभार केवळ ५२% अधिकाऱ्यांमार्फत सुरू असून येत्या ६ महिन्याच्या कालावधीत ही संख्या वाढवून 65 %च्या वर नेऊ असे आश्वासन धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री म्हणून घेतलेल्या पहिल्याच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले होते. त्यानंतर त्यांनी तातडीने जिल्ह्यातील सर्व विभागांचा आढावा घेऊन संबंधित विभागांकडे रिक्त जागा भरण्याबाबत पाठपुरावा सुरू केला आहे.

त्यानुसार राज्य शासनाने पदोन्नती वरील पदस्थापना व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांवर येत असलेला अधिकचा भार यावरील उपाययोजनांचा भाग म्हणून पदोन्नती – पदस्थापना यादी जाहीर केली आहे.

या यादीनुसार बीडसाठी अप्पर जिल्हाधिकारी म्हणून श्री. तुषार ठोंबरे तसेच अंबाजोगाई विभागासाठी श्रीमती मंजुषा मिसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीड चे अप्पर जिल्हाधिकारी पद हे फेब्रुवारी – २०१९ पासून रिक्त होते व याचा प्रभार उपजिल्हाधिकारी डॉ. प्रवीण धरमकर यांच्याकडे तर अंबेजोगाई विभागाचे पद गेल्या काही वर्षांपासून रिक्त होते व तेथे श्रीमती जाधव यांच्याकडे अतिरिक्त प्रभार देण्यात आलेला होता.

गेल्या अनेक दिवसांपासून याबाबतची मागणी मुंडे यांनी लावून धरली होती. अखेर या मागणीला यश आले असून राज्य शासनाचे उपसचिव डॉ. माधव वीर यांच्या आदेशान्वये या दोन्ही अपर जिल्हाधिकाऱ्यांना नियुक्त स्थळी तात्काळ रुजू होण्याचे आदेशित करण्यात आले आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या नियुक्तीबद्दल समाधान व्यक्त केले असून जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरील उपाययोजना व इतर रखडलेली कामे यांना आता वेग येईल अशी आशा व्यक्त केली आहे, तसेच जिल्ह्यातील अन्य महत्वाची रिक्त पदेही लवकरच भरण्यात येतील, यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचेही मुंडेंनी म्हटले आहे.

COMMENTS