धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर, स्व. गोपीनाथराव मुंडेंना केले अभिवादन ! VIDEO

धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर, स्व. गोपीनाथराव मुंडेंना केले अभिवादन ! VIDEO

परळी – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचे काका तथा माजी केंद्रीय मंत्री दिवंगत भाजप नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या गोपीनाथ गड येथील स्मृतिस्थळी जाऊन त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले. 03 जून 2014 रोजी दिल्ली येथे केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. राजकीय जडण घडणीत धनंजय मुंडे हे गोपीनाथराव मुंडे यांच्या सोबतीने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात सक्रिय झाले होते.

दरम्यान धनंजय मुंडे यांनी पुण्यतिथीच्या निमित्ताने स्व. गोपीनाथराव मुंडे हे आपल्या गुरुस्थानी आहेत असे सांगणारा एक संग्रहित व्हीडिओ पोस्ट करून एक भावनिक पोस्ट केली आहे. धनंजय मुंडे हे गोपीनाथरावांना अप्पा म्हणत, त्यांनी सत्तेत आल्यानंतर स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेल्या ऊसतोड मजूर, कष्टकरी, वंचित उपेक्षित, दीन – दुबळ्यांची सेवा करण्याची आपल्याला संधी या सरकारमध्ये मिळाली असल्याचे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून गोरगरीब – कष्टकऱ्यांचे आयुष्यमान प्रगती पथावर नेण्यासाठी आपल्याला काम करायचे असून, या वर्गाचे जीवनमान उंचावण्यासाठी, विकासासाठी मला बळ द्या; अशी भावनिक साद धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्टद्वारे घातली आहे.

येणाऱ्या काळात गोरगरीब – कष्टकरी, वंचित – उपेक्षित वर्गाच्या आयुष्यात थोडेफार जरी सकारात्मक बदल घडवणारे काम करता आले तर तीच स्व. मुंडे साहेबांना खरी श्रद्धांजली असेल तसेच आपल्या गुरूला अर्पण केलेली गुरुदक्षिणा असेल असेही धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांनी गोपीनाथगड येथील स्मृतीस्थळी जाऊन आज दुपारी स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेत अभिवादन केले; यावेळी मुंडे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी सिरसाट, जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे, रा. कॉ. चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, संजय गांधी रोजगार हमी योजनेचे अध्यक्ष राजाभाऊ पौळ, रा. कॉ.चे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, तपोवनचे सरपंच चंद्रकांत कराड, युवानेते अभय मुंडे, रामेश्वर मुंडे, माऊली पाटील मुंडे, नंदकिशोर मुंडे, रवी आघाव, विलास मुंडे यांसह आदी उपस्थित होते.

COMMENTS