देशात दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढवला, वाचा – काय बंद आणि काय सुरु राहणार?

देशात दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढवला, वाचा – काय बंद आणि काय सुरु राहणार?

मुंबई – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढवला आहे. त्यामुळे १७ मे पर्यंत लॉकडाऊन असणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांशी 3 मे नंतरच्या परिस्थिती विषयी चर्चा केली. या चर्चेतून मोदी सरकारनं आणखी दोन आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. परंतु ग्रीन आणि ऑरेंज झोनमधल्या नागरिकांना लॉकडाऊनमध्ये काही सवलती मिळण्याची शक्यता आहे.

काय सुरु राहणार?

रेड झोनमध्ये मोजक्या कारणांसाठी वाहनांतून प्रवास करता येईल. एका चारचाकी गाडी ड्रायव्हर वगळता केवळ दोनच व्यक्ती प्रवास करू शकतील. दुचाकीवर केवळ एकच व्यक्ती प्रवास करू शकेल. तसेच SEZ आणि औद्योगिक वसाहतींमध्ये काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक गोष्टींचं उत्पादन करणारे उद्योग, औषधांचे उद्योग, त्यांना कच्चा माल पुरवणारे उद्योग, IT हार्डवेअर उद्योग, तागाचा उद्योग यांना काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शहरांतल्या बांधकामांना आणि अपारंपारिक ऊर्जा प्रकल्पांच्या बांधकामांना परवानगी आहे, पण कामगारांना साईटवरच राहावं लागणार आहे.

काय बंद राहणार ?

रेड झोनमध्ये रिक्षा, सायकल रिक्षा, टॅक्सी, कॅब, बसेस, सलून, स्पा बंदच राहणार आहेत. मंदिर, मशिदी, चर्चे, इत्याही प्रार्थनास्थळं लोकांसाठी बंद असणार आहेत.संपूर्ण देशात रस्त्यांवरून, रेल्वेने, मेट्रोने आणि विमानांनी वाहतूक बंद राहणार आहे. तसेच सर्व झोन्समध्ये शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, हॉटेल, थिएटर, मॉल, जिम, क्रीडा संकुल, सामाजिक/राजकीय/सांस्कृतिक समारंभ या गोष्टी बंदच राहणार आहेत. विमान, रेल्वे आणि रस्त्याने प्रवासाची परवानगी फक्त काही विशिष्ट कामांसाठी केंद्रीय गृह मंत्रालय देणार आहे.

रुग्णांचा आकडा वाढताच

दरम्यान आज राज्यात 1008 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण आकडा 11 हजार 506 वर, तर मृतांची संख्या 485 झाली आहे. औरंगाबाद शहराला सलग पाचव्या दिवशी मोठा धक्का बसला असून औरंगाबाद शहरात नव्याने 32 कोरोना रुग्ण आढळले
आहेत. तर एकट्या संजय नगर मुकुंदवाडीत 18 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 209 वर पोहचला आहे.

COMMENTS