काँग्रेस – राष्ट्रवादीचे 4 विद्यमान आमदार 31 जुलै रोजी करणार भाजपमध्ये प्रवेश !

काँग्रेस – राष्ट्रवादीचे 4 विद्यमान आमदार 31 जुलै रोजी करणार भाजपमध्ये प्रवेश !

मुुंबई – निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. त्यातही भाजपमध्ये त्याचे प्रमाण जास्त आहे. अनेकांच्या नावांची चर्चा आहे. भाजप प्रवेशाबाबत रोज नवनवी नावे समोर येत आहेत. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चार आमदारांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. त्यानुसार हे चारही आमदार येत्या 31 जुलैला म्हणज्येच येत्या बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत गरवारे क्लबमध्ये होणा-या कार्यक्रमात हे चारही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

भाजपमध्ये प्रवेश करणा-या आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 तर  काँग्रेसच्या एका आमदाराचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये साता-याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघातील वैभव पिचड, नवी मुंबईतील ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांचा समावेश आहे. तर मुंबईतील नायगाव मतदारसंघाचे काँग्रसचे आमदार कालिदास कोळंबकर यांचा समावेश आहे. कालच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी येत्या 31 तारखेला मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर हे आमदार भाजपच्या गळाला लागल्याचं स्पष्ट झालं आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या भाजप प्रवेशाची मोठी चर्चा होती. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत निर्णय झाला नसल्याचं बोलंल जातंय. त्याशिवाय राष्ट्रवादीचे आणखी दोन आमदार पक्ष सोडण्याची स्थितीत असल्याचं बोललं जातंय. मात्र ते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यापैकी यवतमाळ जिल्ह्यातील पुसदचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री मनोहर नाईक यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्याही शिवसेना प्रवेशाची चर्चा जोरात सुरू आहे. त्याशिवाय राष्ट्रवादीचे नांदेड जिल्हाध्यक्ष श्रीनिवास गोरठेकर यांनी आजच राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. त्यांनी अजून कुठल्या पक्षात जाणार हे जाहीर केलं नसलं तरी ते भाजपात जाण्याची शक्यता आहे. गोरठेकर हे माजी  मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात भोकरमधून भाजपच्या चिन्हावर किंवा भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

COMMENTS