मुंबईत काँग्रेस आमदाराच्या पोस्टरवरुन हाताचं चिन्ह गायब, शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा !

मुंबईत काँग्रेस आमदाराच्या पोस्टरवरुन हाताचं चिन्ह गायब, शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा !

मुंबई – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक आमदार विकासमांची उद्घाटने मोठ्या प्रमाणात उरकून घेत आहेत. मुंबईतील मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनीही काल विविध विकासकामांची उद्घाटने केली. मात्र कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेल्या पोस्टरवरुन काँग्रेसचं हात हे चिन्ह गायब होतं. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अस्लम शेख हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मात्र त्यांचा मालाड मालवणी हा मतदारसंघ युतीमध्ये भाजपच्या वाटेला गेलेला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे राम बारोट दोन नंबरवर राहिले होते. त्यामुळे भाजप ही जागा सोडायला तयार नाही. मात्र आता काही जागांच्या आदलाबदलीमध्ये ही जागा शिवेसनेसाठी सुटेल अशी चर्चा आहे. त्यामुळेच आता अस्लम शेख यांनी त्यांच्या पोस्टरवरुन काँग्रेसचं चिन्ह हटवल्याची चर्चा आहे.

अस्लम शेख यांनी शिवेसनेत प्रवेश केल्यास काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल. कारण एक तरुण मुस्लिम चेहरा काँग्रेसला गमवावा लागेल. काँग्रेसचा जनाधार गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात घटला आहे. त्यांचा पारंपरिक मतदार असलेला दलित मुुस्लिम हा मतादरही काँग्रेसपासून दूर गेल्याचं चित्र आहे. तरीही या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कााही अपवाद वगळता मुस्लिम मतदारांनी काँग्रेसला साथ दिली होती.  गेल्या काही दिवसात गैरमुस्लिम आमदारांनी भाजप सेनेची वाट धरली आहे. त्यामुळे काँग्रेस आधीच अडचणीत आली आहे. त्यातच आता मात्र मुस्लिम आमदारच शिवसेनेची वाट धरु लागले तर काँग्रेसची चिंता आणखीनच वाढणार आहे.  काँग्रेस पक्ष यातून आता कसा मार्ग काढतो ते पहावं लागेल.

COMMENTS