पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचा बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर !

पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचा बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर !

सांगली – पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचा बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस नेत्या जयश्री पाटील या राष्ट्रवादीच्या वाटेवर असून काँग्रेसमधील गटबाजी आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याने हा निर्णय त्यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या प्रवेशाला राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरून ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती समजते.

दरम्यान जयश्री पाटील ह्या, माजी मंत्री स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी आहेत. श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने, सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमधील मोठा गट राष्ट्रवादीत सामील होईल तसेच सांगली महापालिका, बाजार समिती, जिल्हा सहकारी बँकेमध्ये राष्ट्रवादीची ताकत वाढणार असल्याचं दिसत आहे.

सांगली जिल्ह्यात काँग्रेसमध्ये मंत्री विश्वजित कदम आणि युवा नेते विशाल पाटील असे दोन गट आहेत. प्रत्येक निवडणुकीत हे दोन गट कधी उघड तर कधी छुप्या पद्धतीने परस्परविरोधी काम करतात. तर दुसरीकडे 2019 च्या सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली होती. पृथ्वीराज पाटील यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं पाठबळ आहे. या सर्व घटना बघता, जिल्ह्यातील मदनभाऊ पाटील गट अस्वस्थ आहे. भाजपासारख्या अन्य पक्षांकडे हे कार्यकर्ते जाण्या अगोदर त्यांना राष्ट्रवादीत घेऊन मोठी राजकीय खेळी राष्ट्रवादी करत असल्याचं ही बोललं जातं आहे.

तसेच श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या अंतिम निर्णयासाठी मंगळवारी त्यांच्या
निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. लवकरच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या
उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार असल्याचे समजते. काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम, (स्व.) मदन पाटील यांच्या पश्चात शहरात काँग्रेसला बळ देण्याचे काम जयश्री पाटील यांनी केले. लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीसह पक्षाच्या विविध पातळीवर कार्यक्रम, आंदोलनात त्या सहभागी
असतात. गेल्या महापालिका निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी स्थापनेपासून ते निवडणूक प्रचारातही त्यांनी आघाडी सांभाळली होती.

परंतु, त्या तुलनेत
काँग्रेसमधून त्यांना व कार्यकर्त्यांना न्याय दिला जात नाही अशी खदखद होती. कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून बळ न दिल्याने विकासकामे होत नसल्याचीही खंत व्यक्त होत आहे. एकूणच या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांतून राष्ट्रवादी प्रवेशासाठी त्यांच्याकडे आग्रह सुरू आहे. याबाबत अनेकवेळा चर्चाही झाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अर्थमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशीही राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चर्चा सुरू होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशीही चर्चा झाल्यी असल्याची माहिती आहे.

COMMENTS