भाजप-शिवसेना युतीला काँग्रेस पक्षाचे 10 प्रश्न !

भाजप-शिवसेना युतीला काँग्रेस पक्षाचे 10 प्रश्न !

मुंबई – भाजप शिवसेना अभद्र युतीच्या पार्श्वभूमीवरती अफझल खानाशी युती करणा-याला शिवाजी महाराजांनी कठोर शिक्षा केली असती असे सांगून शिवसेनेला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही. सत्तेसाठी लाचार शिवसेनेची अवस्था वाकला कणा ,मोडला बाणा, म्हणे मला वाघ म्हणा अशी झाली असल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

शिवसेना भवनावरून शिवाजी महाराजांची प्रतिमा शिवसेनेने हटवावी अशी मागणी करून मुंबई येथे पत्रकारपरिषदेला संबोधित करताना सावंत म्हणाले की, शिवसेना ही आता कीवसेना झाली आहे. आज सगळ्यात जास्त दुःखी, असहाय व मानसिक धक्क्यात शिवसैनिक आहेत. येणारी निवडणूक मोदी समर्थक व मोदी विरोधक यांच्यामध्ये होणार आहे. भाजप शिवसेनेची अभद्र युती ही काँग्रेस महाआघाडीच्या फायद्याची असणार आहे. मोदी विरोधाचे खोटे मुखवटे गळून पडले हे चांगले झाले.  भाजपचा पराभव करण्याकरिता सर्व जनता एकवटली आहे. त्यामुळे शिवसैनिकही आगामी निवडणुकीत काँग्रेसला मतदार करतील. पाच वर्षातील पापांचा घडा दोन्ही पक्षांना एकत्रीतपणे उचलावा लागेल असे सावंत म्हणाले.

यापुढे बोलताना सावंत म्हणाले की गेली पाच वर्ष भाजप शिवसेनेने जनतेला विश्वासघाताचा चित्रपट दाखवला आहे. सर्वोत्कृष्ठ अभिनेते म्हणून ऑस्करचे नामांकन मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांना मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करू. या दोघांच्या उत्कृष्ठ अभिनयाने जनतेची फसवणूक मात्र निश्चित झाली आहे. सत्तेच्या स्वार्थापायी दोन्ही पक्ष एकत्र आले असले तरी या दोघांच्या मुखातून आलेले जनतेच्या मनातील प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत. काँग्रेस पक्ष आज तेच प्रश्न त्यांना विचारत आहे.

काँग्रेस पक्षाचे भाजप शिवसेना युतीला प्रश्न खालीलप्रमाणे

1) मुख्यमंत्री म्हणाले होते की, मुंबई 25 वर्ष शिवसेनेच्या सत्तेत सडली आता मुंबईकरांचे भवितव्य अधिक सडवण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे का?

2) भाजपला मुंबई महापालिकेत दिसणारे माफियाराज संपले का?वांद्र्यातील साहेब व त्यांचा पी.ए. कोण? कालच्या पत्रकार परिषदेत ते कुठे होते?

3) शिवसेनेच्या म्हणण्यानुसार मुंबईतील भ्रष्टाचारी कंत्राटदार भाजपाचे होते ते आता अधिकृतपणे युतीचे होणार का? त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे संघटीत गुन्हेगारी कायद्यां अंतर्गत कारवाई कऱणार का?

4) उद्धव ठाकरेंच्या म्हणम्यानुसार राम मंदिर पारदर्शक आहे ते दिसत नाही मग आता तेच राम मंदिर अपारदर्शक झाल्याने दिसू लागले का?

5) मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या घोटाळ्यास सेना जबाबदार होती व आर्थिक व्यवहारांचे अंतर्गत लेखापरीक्षण झाले नव्हते. आता त्याला युती जबाबदार राहील का? आणि मुंबई महानगर पालिकेविरोधातील तक्रारींसाठी मुख्यमंत्र्यांनी घोषीत केलेली विशेष उपलोकायुक्तांची नियुक्ती आता होणार की नाही? मुंबई महानगरपालिकेच्या सर्व करारांची न्यायालयीन चौकशी कधी होणार?

6) युती अखंड महाराष्ट्राची शपथ घेणार की वेगळ्या विदर्भाची?

7) मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे ठाणे माहापालिकेने वाटलेल्या भूखंडांची चौकशी कधी होणार?

8) उद्धव ठाकरे यांच्या काळ्या पैशाचे काय झाले? उद्धव ठाकरेंची संपत्ती जाहीर करण्याबाबत भाजपची आता काय भूमिका आहे? उद्धव ठाकरेंच्या मागणीप्रमाणे भाजप अमित शाह यांची संपत्ती जाहीर करणार का?  उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपात तथ्य आहे त्यामुळे किरीट सोमय्यांनी ईडीकडे तक्रार करावी असे मुख्यमंत्री म्हणाले होते आता त्या तक्रारीचे काय झाले?

9) शिवसेनेच्या म्हणण्याप्रमाणे किरीट सोमय्या घोटाऴेबाज आहेत की नाहीत? टँकर घोटाळ्याचे काय झाले?मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे खंबाटा प्रकरणाची चौकशी होणार की नाही?

10) नागपूरचे महापौर असताना मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचार केला असे शिवसेनेचे म्हणणे होते त्याची चौकशी कोण करणार?

यासोबतच सौदी अरेबियाच्या अरामको या कंपनीशी नाणार प्रकल्पासाठी केलेला सामंजस्य करार संपुष्ठात आणावा अशी मागणी सावंत यांनी केली. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारच्या विरोधाला न जुमानता सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनी पाकिस्तानला भेट देऊन जवळपास दीड लाख कोटी रूपयांची मदत या दहशतवादी राष्ट्राला जाहीर केली. स्वतःला पाकिस्तानचा ब्रँड अम्बॅसीडर घोषीत करून मौलाना मसूद अझहरला दहशतवाद्यांच्या यादीत सामाविष्ठ न करण्याचा पुरस्कार केला त्यामुळे भाजपने पोकळ राष्ट्रवादाच्या गप्पा न करता पाकिस्तानला  मदत करणा-या सौदी अरेबियाच्या सरकारसोबत केलेल्या कराराचा पुर्नविचार केला पाहिजे असे सावंत म्हणाले.

COMMENTS