उद्योगांची जबाबदारी मी घेतो, आमच्या भूमीपुत्रांना सांभाळण्याची जबाबदारी तुम्ही घ्या – मुख्यमंत्री

उद्योगांची जबाबदारी मी घेतो, आमच्या भूमीपुत्रांना सांभाळण्याची जबाबदारी तुम्ही घ्या – मुख्यमंत्री

औरंगाबाद – उद्योगांची जबाबदारी मी घेतो, पण इथल्या आमच्या भूमीपुत्रांना सांभाळण्याची जबाबदारी तुम्ही घ्या, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योजकांना केलं आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबाद शहरातील कलाग्राम इथे आयोजित केलेल्या अॅडव्हॅनटेज महाराष्ट्र या महाएक्स्पोचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, एमआयएम खासदार इम्तियाज जलील, शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे उपस्थित होते.

दरम्यान आंतराष्ट्रीय प्रदर्शन भरवता येईल असं केंद्र मी तुम्हाला बनवून देईन. मी नुसतं फीत कापायला आलो नाही तर मी तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन, तुमच्या अडचणी दूर केल्या तर तुम्ही मोठी झेप घ्याल. मी तुमच्या अडचणी दूर करेन, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं.तसेच आजपर्यंत इच्छा असूनही अधिकारांची ताकद आपल्याकडे नव्हती ती आता मिळाली आहे. आम्ही उद्योजकांना पूर्वीचे विरोधी सरकार वाईट असल्याचं सांगायचो, पण आता सांगता येणार नाही. आता आम्हाला काम करुन दाखवावं लागेल, संकटावर मात करावी लागणार आहे. माझे आजोबा सांगायचे संकटांच्या छाताडावर चालून जा, ते जमलं पाहिजे असंही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

COMMENTS