मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील महत्त्वपूर्ण बैठकीत  ‘या’ विषयावर एकमत!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील महत्त्वपूर्ण बैठकीत ‘या’ विषयावर एकमत!

मुंबई – राज्यातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मुंबईतील लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत एकमत झाले असल्याची माहिती आहे. किमान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तरी लोकल सेवा सुरु करावी, असे बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करणार आहेत. येत्या ३१ तारखेला लॉकडाऊनचा कालावधी संपत आहे. त्यामुळे आता लवकरच राज्य सरकारकडून नव्या सूचना जारी केल्या जाणार आहेत. याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

दरम्यान महाविकास आघाडीच्या बैठकीपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. आता भेटीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त सदस्य प्रकरणावरून राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यातच अलीकडे खुद्द राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुचना दिल्या होत्या. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गैरहजर राहिले होते. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद निर्माण झाला आहे. एवढंच नाहीतर राज्यपालांनी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.

परंतु या भेटीनंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून राज्यपाल आमचे मार्गदर्शक असून ही एक सदिच्छा भेट होती. राज्यपाल यांच्याशी जुने संबंध आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राज्यपाल अचानक प्रिय कसे झाले असं विचारलं असता, राज्यपाल प्रियच असतात, ते राज्याचे पालक असतात असं त्यांनी म्हटलं आहे.

राज्यपाल आमचे मार्गदर्शक आहेत. गेल्या काही दिवसांपासून आमची भेट राहिली होती. ही एक सदिच्छा भेट आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील संबंधही अत्यंत मधुर आहेत. दोघांना एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील संबंध जसे पिता-पुत्राचे असतात तसेच आहेत ते तसेच राहतील. आमच्यात कोणतीही दरी नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

COMMENTS