दिल्लीसारख्या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको, कोणतेही धार्मिक कार्यक्रम होणार नाहीत याची खबरदारी घ्या, मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना !

दिल्लीसारख्या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको, कोणतेही धार्मिक कार्यक्रम होणार नाहीत याची खबरदारी घ्या, मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना !

मुंबई – दिल्लीतल्या मरकजमुळे कोरोनाच्या चिंतेत वाढ झाली. महाराष्ट्रात कोणत्याही जाती धर्माचे सण, उत्सव, मेळावे होणार नाही याची खबरदारी घ्या, प्रसंगी मी स्वत: त्यांच्या आयोजकांशी बोलेल पण कोरोनाचे संकट जाऊस्तोवर कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही निमित्ताने गर्दी होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्या असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. आज त्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला त्यावेळी अधिक काळजी घेण्याच्या आणि मरकजमधील सहभागी व्यक्तींनी तातडीने पुढे येऊन आपल्या तपासणीसाठी सहकार्य करावे असे आवाहनही केले.

बाजारांमध्ये गर्दी दिसता कामा नये

मुख्यमंत्री म्हणाले की, विलगीकरणाचे पालन झालेच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत गर्दी दिसली नाही पाहिजे यासाठी जे जे तुमच्या अधिकारांत आहे ते करा. आपण नागरिकांच्या सुविधेसाठी २४ तास दुकाने उघडी ठेवली आहेत मात्र काही ठिकाणी लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत असे दिसते. भाजीबाजारांमध्ये सुद्धा सुसूत्रता आणणे आवश्यक आहे. तिथे शिस्त लावा. अनेक ठिकाणी चिंचोळ्या गल्ल्या आहेत ,त्यामुळे देखील गर्दी वाढते. एकतर तेथील बाजाराला दुसरीकडे मोकळ्या जागेवर हलवा किंवा वेळा ठरवून द्या.

महसूल प्रशासनाचे कौतुक

आरोग्य, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, आणि कायदा व सुव्यवस्था अशा तीन आघाड्यांवर आपल्याला लढावे लागत आहे. आज साधारणपणे १ महिना झाला आहे. ज्याप्रमाणे आरोग्य यंत्रणा, पोलीस राबताताहेत त्याप्रमाणे राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि सर्व महसूल यंत्रणा २४ तास काम करते आहे, त्यासाठी त्यांना धन्यवाद दिले पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, विशेषत: आपल्याला ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल. पुणे परिसरात बरीच वृद्धाश्रमे आहेत त्यांचीही मदत आपण घेऊ शकतो का ते पहा.

परराज्यातील कामगार,श्रमिकांची संपूर्ण काळजी घ्या

परराज्यातील कामगार, स्थलांतरीत यांच्यासाठी आपण राज्यात निवारा गृहे सुरु केली आहेत.त्यात कोणतीही अडचण येणार नाही, आणि त्यांना पुरेशा सोयी मिळतील असे पाहण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. जिल्हा बंदी तसेच राज्य बंदीची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. यात कुचराई झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले.

आशा, अंगणवाडी सेविकाची मदत घ्या

सध्या आरोग्य यंत्रणेवर खूप ताण आहे. डॉक्टर, नर्सेस , सहायक कर्मचारी यांना दिवस रात्र काम करावे लागते. आपण पुढील काही दिवसांत आशा, अंगणवाडी सेविका, होमगार्ड्स यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांना देखील मदतीसाठी तयार ठेवा. विविध आवश्यक वैद्यकीय उपकरणे राज्य शासन प्रयत्न करून आणतच आहे मात्र दर्जाहीन आणि मिळेल ते उपकरण घेऊन आरोग्याला धोका करून घेऊ नका असेही मुख्यमंत्री म्हणाले.

COMMENTS