वाढदिवसाच्या ‘त्या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्री भारावले!

वाढदिवसाच्या ‘त्या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्री भारावले!

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काल वाढदिवस होता. मुख्यमंत्र्यांना वाढदिसानिमित्त राज्यभरातील अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या. अनेकांनी भेटवस्तूही दिल्या परंतु एका भेटवस्तूने मुख्यमंत्री भारावून गेले होते. एका गरिब कुटुंबातील महिलेने मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 101 रुपयांची मदत पाठवली आहे. या भेटवस्तुने मुख्यमंत्री भारावून गेले होते. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अहमदनगरमधील रेणुका गोंधळी यांनी मजुरीच्या पैशातील 101 रुपये मनिऑर्डरने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी पाठवले आहेत. तसेच यासोबत त्यांनी एक पत्र देखील पाठवले आहे. या पत्रात रेणुका यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून एका कॅन्सरग्रस्त बालकाला जीवनदान मिळाले होते. औरंगाबाद जिल्ह्यातील कनकोरी (ता.गंगापूर) येथील वेदांत भागवत पवार हा 5 वर्षीय बालक पित्ताशयाच्या कर्करोगाने ग्रस्त होता. वेदांतचे वडील वाळूज औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत काम करतात तर आई शेतात मजुरी करते. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील या बालकाच्या उपचाराचा खर्च पेलवणे पालकांना शक्य नव्हते. त्यामुळे या बालकाची आत्या रेणुका सुनील गोंधळी यांनी मुख्यमंत्रेयांकडे मदत मागितली होती. त्यानंतर याची दखल घेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून या बालकावरील उपचारापोटी तात्काळ एक लाख 90 हजारांची मदत केली. या मदतीमुळे मुंबईतील एसआरसीसी चिल्ड्रन रुग्णालयात वेदांतवर उपचार करणे शक्य झाले आणि त्याला जीवनदान मिळाले.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रेणुका गोंधळी यांनी मजुरीच्या पैशातील 101 रुपये मनिऑर्डरने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी पाठवले.

“आपण माझ्या मोबाईलवरील संदेशाची दखल घेऊन माझ्या भाच्याला जीवनदान दिले. अशीच सेवा आपल्या हातून इतर सामान्यांची घडो यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून माझ्या मजुरीतील अल्प स्वरुपातील रक्कम मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी पाठवत आहे. आपणास परमेश्वर मोठे आयुष्य देवो, या राष्ट्राची सेवा करण्याचे भाग्य लाभो, हिच ईश्वरचरणी प्रार्थना.” असल्याचं रेणुका यांनी पत्रात म्हटले आहे.

COMMENTS