बुलढाणा मतदारसंघात तुल्यबळ तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार ?

बुलढाणा मतदारसंघात तुल्यबळ तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार ?

बुलढाणा – बुलढाणा लोकसभा मतदारसंघात अजून आघाडी आणि युतीचे उमेदवार ठरायचे असले तरी मतदारसंघात तिरंगी तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीने आमदार बाळाराम शिरस्कर यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना भाजप युतीकडून विद्यमान खासदार शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. तर आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.

वंचित बहुजन आघाडीनं राज्यातला पहिला उमेदवार जाहीर केला तो बुलढाणा मतदारसंघाचा. सध्या अकोला जिल्ह्यातून आमदार असलेले बाळाराम शिरसकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. वास्तविक जिल्हाबाहेरचा उमेदवार असला तरी जातीचं गणित लक्षात घेऊन शिरसकर यांना उमेदवारी दिल्याचं बोललं जातंय. बुलढाणा मतदारसंघात माळी मतदारांची मोठी संख्या आहे. सिरसकर हे माळी समाजाचे आहेत. दुसरीकडे युतीचे आणि आघाडीचे उमेदवार मराठा समाजाचे असण्याची शक्यता आहे. या सर्व घटकाचा शिरसकर यांना फायदा होण्याची शक्यता आहे. तसंच मतदारसंघात भारिप बहुजन महासंघाचे काही पॉकेट्स आहेत. त्यामुळे काही प्रमाणात दलित मते आणि एमआयएममुळे काही प्रमाणात मुस्लिम शिसस्कर यांना पडतील असा बंचित बहुजन आघाडीचा दावा आहे.

दुसरीकडे युती झाल्यामुळे विद्यमान खासदार शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनाच पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता आहे. युती झाल्यामुळे कागदावर जाधव यांचं पारडं जड वाटत असलं तरी प्रत्यक्षात तसंच होईल याची शास्वती नाही. कारण राजकारणात एक अधिक एक दोन कधीच होत नाही असं म्हटलं जातं. तशीच परिस्थिती बुलढाणा मतदारसंघात आहे. गेल्यावेळी मोदी लाटेत प्रतापराव जाधव मोठ्या फरकाने जिंकले होते. यावेळी मात्र चित्र वेगळं आहे. त्यांच्याविषयी मतदारसंघात नाराजी आहे. दुसरं म्हणज्ये शिवसेनेतील एक गट त्यांचं मनापासून किती काम करेल याबातही साशंकता आहे. भाजपच्या चैनसुख संचेती आणि सागर फुंडकर यांनी लोकसभेची तयारी सुरू केली होती. त्यामुळे ते दोघे जाधव यांचं मनापासून किती काम करतील याबाबतही साशंकता आहे. सर्वांची नाराजी दूर झाली आणि सर्वांनी एकोप्याने काम केले तर जाधव यांना दिल्ली दूर असणार नाही हे मात्र नक्की.

राष्ट्रवादीने डॉ. राजेंद्र शिंगणे यांना बळचं घोड्यावर बसवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. त्यांनी मनापासून लढाई करायचं ठरवलं तर ते चांगली लढत देऊ शकतील असं सध्याचं तरी चित्र आहे. दोन्ही काँग्रेसमध्ये ब-यापैकी मनोमीलन झालं आहे.  शिंगणे यांच्याबद्दल मतदारसंघात सध्या सहानभुती आहे. अनेक पक्षात त्यांचे मित्र आहेत. त्याचाही त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र वंचित बहुजन आघाडी त्यांच गणित बिघडवते का ते पहावं लागेल. कारण त्यांची हक्काची मुस्लिम होटबँकेला बाळाराम सिरस्कर किती डॅमेज करता त्यावर शिंगणेंच्या जय पराजयाचं गणित अवलंबून आहे. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवी तुपकरही लोकसभा लढवू इच्छित आहे. त्यांना तिकीट मिळालं नाही तर ते काय भूमिका घेतात यावरही बरीच गणितं अवलंबून आहेत. एकंदरीत काय तर ही निवडणूक तिरंगी आणि चुरशीची होईल असं सध्यातरी चित्र आहे.

COMMENTS