भाजपच्या ‘या’ दोन खासदारांविरोधात याचिका दाखल, निवडणुकीतील विजयावर आक्षेप !

भाजपच्या ‘या’ दोन खासदारांविरोधात याचिका दाखल, निवडणुकीतील विजयावर आक्षेप !

मुंबई – गेल्या 24 तासात राज्यातील भाजपच्या दोन खासदारांविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि नागपूरमधील खासदार नितीन गडकरी आणि बीडमधील भाजपच्या खासदार प्रितम मुंडे या दोन खासदारांविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या दोन्ही नेत्यांच्या खासदारकीला न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी नागपूरमधून विजय मिळवला होता. या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान गडकरी यांनी आयोगाने दिलेल्या नियमांचे पालन केले नसल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. त्यामुळे ही निवडणूक रद्द करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. पटोले यांनी ही याचिका केंद्रीय निवडणूक आयोग, आयोगाचे काही अधिकारी आणि नितीन गडकरी यांच्या विरोधात दाखल केली आहे.

दरम्यान भाजपच्या बीडमधील खासदार प्रितम मुंडे यांच्याविरोधातही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत खासदार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्यात आला असून प्रीतम मुंडे यांनी आपल्या शपथपत्रात खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

‘प्रीतम गोपीनाथ मुंडे’ नावाने बीड जिल्ह्यातील नाथरा येथे मतदार यादीत प्रीतम यांचं नाव आहे. तर मुंबई येथील वरळीमध्ये प्रीतम गौरव खाडे नावाने त्यांचं मतदार यादीत नाव असल्याचा आरोप याचिकाकर्ते कालिदास यांनी केला आहे. तसेच मुंबईतील वरळी येथील प्लॉट 1201 स्थावर मालमत्तेची माहिती प्रीतम मुंडे यांनी लपवली असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रीतम मुंडे यांच्याकडे वेगवेळ्या नावाने आयकर विभागाचे दोन ओळखप्रत्र आहेत असंही याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. प्रीतम मुंडे या वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळात सहभागी आहेत. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या गुन्हय़ाची माहिती त्यांनी लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

COMMENTS