मी महाराष्ट्रापासून दूर कशी जाईन?, आपलं जे मूळ असतं तिथून आपण दूर जात नाही – पंकजा मुंडे

मी महाराष्ट्रापासून दूर कशी जाईन?, आपलं जे मूळ असतं तिथून आपण दूर जात नाही – पंकजा मुंडे

मुंबई – भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षश्रेष्ठींकडून राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी सोपवली जाणार आहे. त्याबाबत बोलताना मुंडे यांनी मी महाराष्ट्रापासून दूर नाही. मी महाराष्ट्राच्या टीममध्ये तर आहेच, आजही भाजपच्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीत मला पाचरण करण्यात आलं. त्यामुळे मी महाराष्ट्रापासून दूर कशी जाईन? आपलं जे मूळ असतं तिथून आपण दूर जात नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर त्या बोलत होत्या.

या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप नेते विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि मंगलप्रभात लोढा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी सोपवली जाणार आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीदेखील पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी सोपवली जाणार असल्याचं सांगितलं होतं. पण त्या महाराष्ट्राच्या कोअर कमिटीच्या नेहमी सदस्या असतील असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आज पंकजा मुंडे यांनी या बैठकीला उपस्थिती लावली आहे.

COMMENTS