भाजपचे राज्यभर चक्का जाम आंदोलन

भाजपचे राज्यभर चक्का जाम आंदोलन

मुंबई: पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येशी संबंधित वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचे राज्यभर आंदोलन सुरु केलं असून भाजप महिला मोर्चा या प्रश्वावर अधिक आक्रमक झाल्या आहेत. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजपच्या महिला मोर्चाने राज्यभर चक्का जाम आंदोलन केलं.

पूजा चव्हाण या 22 वर्षाच्या मुलीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. तिच्या आत्महत्येनंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने तक्रार दाखल केली. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली. त्यातच पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांच्या एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिप समोर आल्या. त्यानंतर या ऑडिओ क्लिपमधील आवाज वनमंत्री संजय राठोड यांचाच असल्याचा दावा करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

आत्महत्या करुन आज वीस दिवस झाले तरीही या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या प्रकरणात पोलिसांवर प्रचंड दबाव असल्याने त्यांनी गुन्हा दाखल केला नाही, त्यामुळे या तपासात अडचणी येत आहेत असा आरोप भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

COMMENTS