बिहार विधानसभा निवडणूक – महागठबंधनचं जागावाटप ठरलं !

बिहार विधानसभा निवडणूक – महागठबंधनचं जागावाटप ठरलं !

पाटणा – बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महागठबंधननं त्यांचं जागावाटप निश्चित केलं आहे. सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती पुढे आली आहे. काँग्रेस जवळपास 70 जागा लढवणार आहे. 30 जागा या विविध डाव्या पक्षांना सोडण्यात आल्या आहेत. तर उरलेल्या 143 जागांवर राष्ट्रीय जनता दल निवडणूक लडवणार आहे. मात्र काँग्रेसला हव्या त्याच 70 जागा मिळणार नसल्याचं बोललं जातंय. विहारमध्ये विधानसभेच्या 243 जागा आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत आरजेडी, नितीशकुमार यांचा जेडीयू आणि काँग्रेस यांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. आरजेडी आणि जेडीयू यांनी प्रत्येकी 100 तर काँग्रेसनं 43 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी काँग्रेसला 31 जागांवर यश मिळालं होतं. तर आरजेडीने 100 पैकी तब्ब 81 जागांवर विजय मिळवला होता. मात्र ठरल्याप्रमाणे नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. आता नितीशकुमार हे एनडीएमध्ये गेले आहेत.

जागावाटपासाठी एनडीएमध्येही बैठकांचं सत्र सुरू आहे. चिराग पासवान हे जास्त जागांसाठी अडून बसल्यामुळे एनडीएची जागावाटपाची चर्चा अजून पुढे जाऊ शकली नाही. जीतनराम मांझी यांचा पक्ष आणि इतर छोटे मोठे पक्ष असल्यामुळे एनडीएपुढे जागावाटपाचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. त्यावर कसा तोडगा निघतो ते पहावं लागेल. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी, एमआयएम हेही बिहार निवडणुकीत उतरणार आहेत. तर शिवसेनेचा निर्णय 2 दिवसांत होणार आहे.

COMMENTS