शिवभोजन योजनेचा शुभारंभ 26 जानेवारी रोजी – छगन भुजबळ

शिवभोजन योजनेचा शुभारंभ 26 जानेवारी रोजी – छगन भुजबळ

मुंबई – राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याच्या योजनेचा शुभारंभ 26 जानेवारी 2020 रोजी होणार असल्याची माहिती अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक‍ आज मंत्रालयात आयोजित केली होती. त्यावेळी भुजबळ बोलत होते.

भुजबळ म्हणाले, शिवभोजन योजनेअंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या भोजनालयात 2 चपात्या, 1 वाटी भाजी, 1 मूद भात व 1वाटी वरण समाविष्ट असलेली जेवणाची थाळी 10 रुपयाला देण्यात येईल. या विभागातंर्गत येणाऱ्या सर्व सार्वजनिक वितरणव्यवस्थेचे सक्षमीकरण करुन वाजवी दरात आवश्यक वस्तूंची ग्राहकांना उपलब्धता करुन देणार आहे. सार्वजनिक वितरणासाठी आवश्यक असलेली साठवणूक क्षमता आधूनिक व सक्षम करणार आहे. प्रत्येक शिधापत्रिकेत, महिला सक्षमीकरणासाठी शिधापत्रिका कुटुंब प्रमुख म्हणूनकुटुंबातील ज्येष्ठ महिला सदस्याची निवड करणार आहे. NFSAमध्ये अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांना प्रति महिना 35 किलो धान्य आणि पीएचएच / एपीएल शेतकरी लाभार्थ्यांना प्रती महिना 5 किलो प्रती व्यक्ती धान्य दिले जात आहे. याव्यतिरिक्त, शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्हे, विद्यार्थी वसतिगृहे,आश्रम शाळा, बालगृहे आणि कल्याणकारी संस्था यांना अनुदानित अन्नधान्य पुरवठा केला जाईल. हेउपक्रम अधिक चांगल्याप्रकारे राबविण्यासाठीविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी आवश्यक ती सर्व मदत शासनामार्फत केली जाईल.

रास्त भावधान्य दुकानदारांचे सक्षमीकरण, संगणीकृत सार्वजनिक वितरण व्यवस्था, सार्वजनिक व्यवस्थेद्वारे केरोसीन वितरण, सुधारीत धान्य वितरण प्रणाली, पसंतीनुसार थेट लाभ हस्तांतरण (DBT), कल्याणकारी संस्था व वसतीगृह योजना, गोदाम व्यवस्थापन, तांदुळ फोर्टीफीकेशन, शिवभोजन योजनेच्या तयारीचा आढावा, भविष्यातील विभागाची वाटचाल, वैधमापन शास्त्र विभाग व ग्राहक संरक्षण विभागाची माहिती, विभागातील रिक्त पदांचा आढावा श्री.भुजबळ यांनी सादरीकरणातून घेतला.

यावेळी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, वैधमापनशास्त्र नियंत्रक अमिताभ गुप्ता यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS