पंकजाताई सर्वच संपलंय असं नाही, पण संपू शकतं?

पंकजाताई सर्वच संपलंय असं नाही, पण संपू शकतं?

बीड, परमेश्वर गित्ते – गेल्या तीन आठवड्यात परळीच्या राजकारणात स्मशान शांतता आहे. कारण दिवाळीदरम्यान झालेला पाऊस आणि त्यानंतर सामान्य शेतकर्‍यांची झालेली परवड आणि प्रशासकीय दरबारी असलेली उदासीनता यामुळे परळीचं वातावरण थोडं शांतच बनलं. शिवाय नवनिर्वाचित आ. धनंजय मुंडे हे सध्याच्या राजकीय प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक असल्याने आणि पक्षीय व्यापामुळे त्यांनी मुंबई सोडलेली नाही. आता सर्व आशा, अपेक्षा या प्रामुख्याने विरोधी पक्षात असलेल्या पंकजाताई मुंडे यांंच्या भोवती आहेत. जनता-जनार्धनाने कौल धनंजय मुंडे यांच्या बाजूने दिलेला असला तरी पंकजाताईंना ज्या मतदारांनी समर्थ साथ दिली.

त्या मतदारांना वार्‍यावर सोडून जाता येणार नाही. शिवाय ज्यांनी मतदान विरोधात केले त्यांच्याशी आपले नाते व विश्वास सांधावा लागणार आहे. गेल्या तीन आठवडयामध्ये मतदारसंघ हा अक्षरशः उघडयावर असतांना पंकजाताईंनी (प्रकृती अस्वस्थतेचे कारण) सांगून परळीत येणे टाळले. परंतु गेल्या सप्ताहभरात त्या पक्षकार्यात सहभागी झाल्याचे बैठकांतून दिसून आले. किमान आतातरी मतदारसंघात येणे अपेक्षित आहे.

आजच्या स्थितीला व आजच्या घडीला त्या मतदारांपर्यंत पोहचलेल्या नाहीत किंवा दिलासा दिलेला नाही. खा. डॉ. प्रीतमताई मुंडे या आल्या, बांधावर गेल्या, दुःख जाणून घेतलं आणि पंकजाताईंच्या कानावर घातलं. हे सर्व ठीक आहे. परंतु पंकजाताई तुम्हाला मतदारांनी मातृत्वाचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला मतदारांना टाळून पुढे जाता येणार नाही. आज आपण जर सर्व काही संपलंय असं समजत असाल तर ते चुकीचे आहे. कारण संघर्षातून पुढं जायचं आहे. साहेबाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. जर या सर्व विषयाचं आकलन करून भविष्याचा वेध घ्यायचा असेल तर जमीनीवर यायला लागेल आणि त्यांच्या सुःख-दुःखात रमावे लागेल. तरच पंकजाताई या नावाला वलय प्राप्त होईल. अन्यथा सर्व काही संपू शकतं याचीही भीती तमाम सहकार्यांना आहे.

2014 सालांपासून बीड जिल्ह्यावर निविर्वादपणे स्वतःचे नेतृत्व सिद्ध करणार्‍या तत्कालिन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या कामाची खुबी ही निश्चित वेगळी होती. बीड जिल्ह्याच्या राजकीय सारीपाटावर त्यांना सामान्य माणसाचे व्यापक दुःख कळाले. परंतु त्यांचे कौटुंबिक दुःख दिसले नाही. शिवाय दैनंदिनीमधील प्रश्न समजले नाहीत. हायटेक राजकारण करत कोणालाही न दुखवता सामाजिक हित साध्य केले. वर्तमानातील चुकीच्या गोष्टींना थारा दिला नाही. त्याचा नकारात्मक परिणाम दिसून आला. शेवटच्या दोन वर्षात स्वतःमध्ये बदल केला. परंतु त्याचा लाभ जवळच्यांनी आणि कानामागच्यांनीच घेतला. वास्तव चित्र कधीही जाणवू दिले नाही किंवा पंकजाताईंनी त्याची तसदी घेतली नाही. पी.ए. लोकांनी अक्षरशः पंकजाताईंचा गेम केला.

प्रथितयश, नामवंत किंवा समाजाभिमुख व्यक्तिंना मानाचं पान कधी दिलं नाही. उलट तासन् तास त्यांना ताटकळत उभं केलं. ज्या गोष्टी खूप छोट्या आहेत परंतु त्यांचं महत्त्व पराकोटीचं आहे. अशा गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या. जसं की, चहा आणि पाणी हे कोणालाही विचारलं नाही किंवा प्रश्न जाणून घेतले नाहीत आणि साधी विचारपूसही केली नाही. पंकजाताईंच्या पराभवाची अनेक कारणे आहेत. परंतु आता त्यावर चिंतन आणि मंथन करण्याची जबाबदारी त्यांची आहे आणि त्यासाठीच मतदारांनी त्यांना वेळ दिलेला आहे.

यावर त्या अभ्यास करतील व पुन्हा नव्या जोमाने उभ्या राहतील असा विश्वास त्यांच्या सहकार्यांना आहे. परंतु सद्यस्थितीचा विचार केला तर अनेकांच्या मनात रूखरूख आहे की आज पंकजाताई शेतकरी अडचणीत असतांना, संकटात असतांना त्याला धीर देण्यासाठी पंकजाताईंनी बांधावर यायला हवे होते. निवडणुका येतील जातील, जय-पराजय होत राहतील. परंतु माणुसकीच्या भावनेतून त्यांनी भेटणे व बोलणे अपेक्षित होते. त्यांच्याकडून मतदारसंघाच्या खूप सार्‍या अपेक्षा आहेत. साधारणतः 26 ऑक्टोबर रोजी त्यांनी मुंबई गाठली. त्यानंतर पुन्हा एकदाही परळीत आल्या नाहीत. साधारणतः तीन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे.

या दरम्यान बीड जिल्ह्यात व विशेषतः परळी मतदारसंघात शेतकर्‍यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक गेले आहे. अशा काळात मदतीचा हात मिळवून देण्यासाठी शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्यासाठी त्यांनी येणे अपेक्षित होते. परंतु त्या आल्या नाहीत. त्यांनी खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांना पाठवून दिले आणि प्रीतमताईंनी बांधावर जाऊन दुःख व परिस्थिती जाणून घेतली. सध्या आठवडयांपासून पक्षीय बैठकांमध्ये दिसत आहेत.

तेव्हा आता तरी मतदारसंघात यावे आणि लोकांच्या सुख-दुःखामध्ये रममाण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होते आहे. लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे हे शेतकरी अडचणीत आल्यानंतर ते कोठेही असुद्येत बर्‍याच वेळा तर विदेशातून आले आणि शेतकर्‍यांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला. प्रीतमताईंनी येऊन त्यांची जबाबदारी निभावली परंतु पंकजाताईंनी आले पाहिजे. ही सामान्य जनांची भावना आहे. त्याचा आदर करण्याची जबाबदारी त्यांची आहे.

एकवेळा पराभूत झाल्याने सर्व काही संपलंय असं नाही. आपलंही कुठं चुकलंय किंवा आपल्यांनीच कसा दगा दिला याचंही विश्लेषण होण्याची गरज आहे. कामं भरपूर झाली मग पाणी कुठं मुरलं. परिस्थितीचा फायदा कुणी आणि कसा घेतला याचाही विचार होण्याची गरज आहे. केवळ एक घटक याला जबाबदार आहे. असं नाही. तर भाजपाच्या प्रक्रियेमध्ये असणारा प्रत्येक घटक या पराभवाला जबाबदार आहे. मिसफिडिंग करणे आणि फाजील आत्मविश्वास वाढवणे हा देखील अपराध आहे. तेव्हा अशा मंडळीचा बंदोबस्त करण्याची वेळ आहे.

एकूणच पंकजाताईंनी पराभवाच्या शल्यातून बाहेर येऊन पुन्हा नव्या उर्मीने व नव्या जोशाने काम करावे अशी सामान्य जनांची अपेक्षा आहे. त्यांना साहेबांचे स्वप्न पूर्ण करावयाचे आहे. तशी जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे. याचंही भान त्यांनी ठेवावं असा सूर मतदारसंघामध्ये ऐकू येतोय. या सर्व बाबींचा अभ्यास करून चिंतन व्हावं आणि सर्व काही संपलंय असं नाही तर दुर्लक्ष केल्यास संपू शकतं? हेही त्यांनी ध्यानात घेतलं पाहिजे.?

लेखक अंबाजोगाई येथील दैनिक वार्ता या वृत्तपत्राचे संपादक आहेत.

COMMENTS