बीड नगरपालिका पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय !

बीड नगरपालिका पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय !

बीड – बीड नगरपालिका पोटनिवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांना धक्का बसला आहे. एका जागेसाठी घेण्यात आलेल्या प्रभाग क्र.11 अ मधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोमीन खमरुनिस्सा शरीफोद्दीन यांना 1039 मतं मिळाली असून त्यांचा  315 मतांनी विजय झाला आहे. तर अपक्ष उमेदवार शेख समीरा बेगम खमर यांना 754 मतं मिळाली आहेत. या एका जागेसाठी एकूण सात उमेदवार रिंगणात होते.या निवडणुकीत मुख्य लढत ही राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर विरुद्ध जयदत्त क्षीरसागर यांच्यात पहायला मिळाली. या निवडणुकीत

राष्ट्रवादीकडून मोमीन खमरुनिस्सा शरीफोद्दीन या उमेदवार होत्या तर जयदत्त क्षीरसागर यांनी अपक्ष उमेदवार उभा केला होता. परंतु संदीप क्षीरसागर यांनी चुलते जयदत्त क्षीरसागर यांना धक्का देत याठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजय मिळवून दिला आहे.

बीड नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. यात नगराध्यक्ष म्हणून डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे काम पाहतात तर उपाध्यक्ष हेमंत रवींद्र क्षीरसागर हे काम पाहतात. येणारी लोकसभा निवडणूक पाहता ही पोटनिवडणूक महत्त्वाची समजली जात होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. विजयानंतर संदीप क्षीरसागर यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.

COMMENTS