वंचित बहूजन आघाडीचा लोकसभेतील उमेदवार भाजपच्या बैठकीत, पक्ष बदलणार?

वंचित बहूजन आघाडीचा लोकसभेतील उमेदवार भाजपच्या बैठकीत, पक्ष बदलणार?

मुंबई – लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडीचं राजकारण रंगणार असल्याचं दिसत आहे. कारण काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील वंचित बहूजन आघाडीच्या उमेदवारानं चक्क भाजपच्या बैठकीला हजेरी लावली. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी मुंबईत भाजपाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याच भाजपच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार अस्लम सय्यद देखील उपस्थित होते.

दरम्यान हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टींचा पराभव झाला. या पराभवामागे वंचित बहुजन आघाडीच्या अस्लम सय्यद यांना पडलेल्या मतांमुळे झाला असल्याचं बोललं जात आहे. या निवडणुकीत सय्यद यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेचे आयात उमेदवार धैर्यशील माने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी उतरले होते . यात धैर्यशील माने यांना एकूण ५,८५,७७६ मत पडली होती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना एकूण ४,८९,७३७ मत पडली तर अस्लम सय्यद यांना तब्बल १,२३,४१९ मत पडली होती. अस्लम सय्यद यांनी मते फोडल्याने शेट्टी यांचा पराभव झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे . मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अस्लम सय्यद भाजपच्या बैठकीत सहभागी झाल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत. त्यामुळे सय्यद भाजपमध्ये जातील का हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS